भाजपला पाचव्या केबीनचे लागले वेध; स्थायी सभापतीसाठी फिल्डींग


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेतील प्रमुख सहा राजकीय दालनांपैकी (केबीन) महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण समिती सभापती व सभागृह नेता ही चार दालने सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असून, एक म्हणजे विरोधी पक्ष नेता दालन राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्तेच्या पाचव्या दालनाचे म्हणजे स्थायी समिती सभापतीपदाचे वेध भाजपला लागले आहेत. महापालिका स्थायी समितीच्या रिक्त आठ जागांची निवड तब्बल सहा महिन्यांनंतर गुरुवारी (३० जुलै) महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जाहीर केल्यावर या समितीच्या सभापतीपदासाठीची फिल्डींग भाजपने लावली आहे. अर्थात मित्रपक्ष राष्ट्रवादीकडूनही माजी सभापती गणेश भोसले व कुमारसिंह वाकळे ही दोन नावे सभापतीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, या पदासाठी अपेक्षित असलेल्या घोडेबाजारात सर्व तऱ्हेची ताकद लावू शकणारा आपला सदस्य भाजपने सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले केडगावचे मनोज कोतकर यांच्या रुपाने पुन्हा स्थायी समितीत पाठवला आहे. त्यामुळे आता या पदासाठी तेच दावेदार मानले जात आहेत.

मनपाच्या राजकीय सत्तेच्या दालनांपैकी महापौरपदी बाबासाहेब वाकळे, उपमहापौरपदी मालनताई ढोणे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी लता शेळके व सभागृह नेतापदी स्वप्निल शिंदे ही चार पदे भाजपकडे आहेत. विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांच्याकडे आहे तर सहावे स्थायी समितीचे सभापतीपद बहुजन समाज पक्षाचे मुदस्सर शेख यांच्याकडे सध्या आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीस आता दीड वर्षे झाली आहेत. तसेच जानेवारीत समितीच्या निवृत्त झालेल्या ८ सदस्यांच्या जागी नवे ८ सदस्य गुरुवारी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे आता नव्या सभापतीपदाची निवडणूक अपेक्षित आहे. जानेवारी २०१९मध्ये महापालिकेत सत्तेवर येताना भाजपने राष्ट्रवादी, काँग्रेस व बहुजन समाज पक्षाची मदत घेतली होती. त्यावेळी पहिले सभापतीपद बहुजन समाज पक्षाला दिले गेले होते. दुसऱ्या वर्षीचे हे पदही बहुजन समाज पक्षालाच देण्याचे ठरले होते. पण स्थायी समितीच्या १६ सदस्यांमध्ये या पक्षाचा एकच सदस्य आहे व मागील जानेवारीत निवृत्त झालेल्या सदस्यांच्या यादीत त्यांचा नंबर लागला नाही. परिणामी, तो सदस्य कायम आहे व त्यानेच मागील दीड वर्षापासून सभापतीपद सांभाळले असल्याने आता त्याच्या जागी अन्य पक्षाच्या सदस्याला सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. या अन्य सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे वाकळे व भोसले तर भाजपकडून कोतकर यांची नावे आघाडीवर आहेत. पण महापालिकेतील भाजपच्या सत्तेत अधिकृतपणे राष्ट्रवादी सहभागी होणार नसल्याचे सांगितले जाते, तसेच आता अधिकृतपणे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्ष नेतेपद दिले गेले आहे. परिणामी, कोतकर यांच्या मार्गातील अडचण दूर झाल्याचे मानले जाते.

मागील ३१ जानेवारी २०२० रोजी झालेल्या सोडतीत गणेश कवडे, विद्या खैरे व अमोल येवले हे शिवसेनेचे, अविनाश घुले, दीपाली बारस्कर व शोभा बोरकर हे राष्ट्रवादीचे, मनोज कोतकर व संध्या पवार हे अनुक्रमे भाजप व काँग्रेसचे सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून सभापती शेख (बसप), सेनेचे सुभाष लोंढे, योगीराज गाडे व सुवर्णा जाधव, राष्ट्रवादीचे गणेश भोसले व कुमारसिंह वाकळे, भाजपच्या आशा कराळे अशा आठ सदस्यांनी कारभार पाहिला. गुरुवारी यात आणखी ८ सदस्य नियुक्त झाले. यात भाजपचे मनोज कोतकर व सोनाबाई शिंदे, शिवसेनेचे श्याम नळकांडे व विजय पठारे, राष्ट्रवादीचे डॉ. सागर बोरुडे, परवीन कुरेशी व प्रकाश भागानगरे आणि काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांची नवे सदस्य म्हणून निवड झाली आहे. निवृत्त सदस्यांपैकी केवळ कोतकर यांनाच पुन्हा स्थायी समितीत येण्याची संधी मिळाली आहे. अर्थात पाचवे राजकीय सत्तेचे दालन ताब्यात घेण्याच्या हिशेबाने कोतकर यांना भाजपने म्हणजेच महापौर वाकळेंनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. कोतकर हे मूळचे केडगावचे नेते भानुदास कोतकर यांचे कट्टर समर्थक आहेत. या कोतकरांनंतर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनाही ते आपले आधारस्तंभ मानतात. त्यामुळे ते भाजपमध्ये असले तरी त्यांच्या सभापतीपदाला राष्ट्रवादीची आडकाठी होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या रेसमध्ये शहर शिवसेनेकडून फारसे प्रयत्न होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीकडे समितीतील बहुमतासाठीचा ९ सदस्यांचा आकडा असल्याने सेनेकडून प्रयत्न होण्याची शक्यता कमी आहे. पण महापालिकेतील बहुतांश पदे घोडेबाजारातूनच निवडली जाण्याचा इतिहास असल्याने सभापती निवडीची निवडणूक जाहीर होऊन ती होईपर्यंतच्या राजकारणात काहीही होऊ शकते. मात्र, सध्याच्या घडीला तर भाजपने पाचवे सत्ता दालन ताब्यात घेण्याचे ध्येय समोर ठेवले असून, त्याचीच महापालिकेत जोरदार चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post