व्हेरी गुड न्यूज.. नगरकरांनो, उड्डाणपूल होणार बरं का.. स्टेशन रस्त्यावरील जमिनीची तपासणी सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मागील १५-२० वर्षांपासून राजकारण्यांच्या घोषणामुळे नगरकरांच्या स्वप्नात येत असलेला स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुल अखेर होणार आहे. नगरकरांच्यादृष्टीनेच नव्हे तर मराठवाडा व विदर्भात नगर शहर मार्गे जाणारांसाठी ही व्हेरी गुड न्यूज आहे. पुल उभारणीचे प्रत्यक्ष काम अजून तीन महिन्यांनी सुरू होणार असले तरी त्यादृष्टीने प्राथमिक तयारी म्हणून पुलाचे पिलर (सिमेंटचे मोठे खांब) उभारण्यासाठी जमिनीच्या तपासणीचे काम बुधवारपासून सुरू झाले. 

नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असलेले हे काम आठव़डाभर आधीच सुरू झाले आहे. नगर-पुणे रस्त्यावरील सक्कर चौकात बुधवारी या कामाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते नारळ वाढवून जमिनींतर्गत असलेली माती व तिचा दर्जा तसेच मुरुम, खडक व अन्य घटकांच्या तपासणीचे काम करण्यासाठी ड्रिलींग (खोदकाम) सुरू केले गेले आहे. या कामाचे फोटो व्हॉटस अॅप व सोशल मिडियावर शेअर करून नगरकरांनी आनंद साजरा केला. कोरोनामुळे म्हणा वा याआधी तीन-चार भूमिपूजने उड्डाणपुलासाठी झाली, पण पुल झाला नसल्याने म्हणा, पण यावेळी नवे भूमिपूजन टाळले गेले. पण या जमीन तपासणीच्या कामामुळे आता नगरला उड्डाण पुल होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाची सुरुवात उत्साहात झाली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता प्रफुल्ल दिवाण, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सहाय्यक अभियंता दिग्विजय पाटणकर, मुजीब सय्यद, श्रीकांत लोखंडे, जमीन तपासणीचे काम करणारे प्रवीण महाडिक आदी उपस्थित होते. सक्कर चौकात जमिनीखाली १२ मीटर खोल ड्रिलिंग करून जमिनी खाली कोणत्या प्रकारचा खडक आहे, किती मुरूम आहे, त्याचा दर्जा काय आहे, चुनखडी वा अन्य घटक किती प्रमाणात आहेत, याची तपासणी यात होणार आहे. सक्कर चौक ते जीपीओ चौक अशा ३ किलोमीटर अंतरात हा पुल होत असल्याने या अंतरात ११५ ठिकाणी असे १२ मीटर खोल ड्रिलिंग करून जमिनीची तपासणी होणार आहे व जेथे अशी तपासणी झाली, तेथेच उड्डाणपुलासाठीच्या सिमेंट पिलरची (खांब) उभारणी होणार आहे. या जमीन तपासणी कामासाठी सुमारे तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष पुल उभारणीच्या कामास ऑक्टोबरअखेरीस सुरुवात होणार आहे. 

सक्कर चौक ते जीपीओ चौक ३ किलोमीटर लांबीच्या चौपदरी उड्डाणपुलासाठी २५८ कोटी ३० लाखाची निविदा मंजूर आहे. ठेकेदाराकडून सुमारे १३ कोटीची अनामत रक्कम जमा झाली आहे. या पुलासाठी स्टेशन रस्त्यावर १०.३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे व यापैकी ९० टक्क्याच्यावर भूसंपादन झाल्याचे सांगितले जाते. आता जमिनीतील विविध घटकांच्या तपासणीचे काम सुरू झाल्याने नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाण पुल आता प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post