ठेकेदारांनो...उद्याने चालवायला घेता का? ९ उद्यानांच्या खासगीकरणाचा मनपाद्वारे घाट


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
वारसा अनुकंपाने नियुक्त झालेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना बाग सुधारणा वा झाडे-फुले विकसित करणे व त्यांची जोपासना करण्याचे ज्ञान नाही, त्यामुळे नगरमधील ९ उद्याने खासगीकरणातून चालवता का, अशा अर्थाची विचारणा महापालिकेने समस्त ठेकेदार मंडळींना केली आहे. मनपाच्या सर्वात जुन्या सिद्धीबाग व बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी या दोन मोठ्या उद्यानांसह सात छोट्या उद्यानांना खासगीकरणातून चालवण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने तयार केला असून, २९ रोजी होणाऱ्या ऑनलाइन महासभेत हा विषय मंजूर होणार आहे. त्यानंतर या नऊ उद्यानांचा खासगीकरण (बीओटी तत्वावर) होणार आहे. यातही सिद्धीबाग व महालक्ष्मी उद्यानांचे प्रत्येक ११ वर्षांसाठी तर अन्य ७ उद्यानांचे प्रत्येकी ३ वर्षांसाठी खासगी ठेकेदाराद्वारे पालनपोषण होणार आहे व या बदल्यात या उद्यानांतून येणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारणीची परवानगी महापालिका ठेकादारास देणार आहे. त्यामुळे नगरकरांना आता उद्यानांतील आल्हाददायक मौजमजा पैसे मोजून अनुभवावी लागणार आहे.

 दरम्यान, सावेडी टीव्ही सेंटरमागील गंगा उद्यान सध्या महापालिकाच चालवत आहे, या उद्यानाचे खासगीकरण मागेच झाले होते. पण, तेथे ठेकेदाराकडून आकारले जाणारे शुल्क तसेच या ठेकेदारास महापालिकेकडून उद्यान चालवल्याबद्दल उचलून दिल्या जाणाऱ्या पैशांचा विषय गाजल्यावर ठेकेदाराची तेथून हकालपट्टी केली गेली व आता मनपाद्वारे त्याची देखभाल केली जाते. त्यामुळे उद्याने खासगीकरणाच्या यादीत गंगा उद्यानही येण्याची अपेक्षा होती. पण आता महासभेतील या विषयावरील चर्चेदरम्यान त्याचाही उल्लेख होऊन ९ उद्याने खासगीकरणाच्या ठरावात गंगा उद्यानही समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

सिद्धीबाग उद्यान व महालक्ष्मी उद्यानात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे समाधान होईल, असे वातावरण उपलब्ध करून देणे महापालिकेला जिकिरीचे होत असल्याची दुर्दैवी कबुली महापालिकेने दिली आहे. या उद्यानांच्या असलेल्या महापालिकेच्या जागा, तेथे खेळण्या, त्या वास्तूंची देखभाल, नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचा आस्थापना खर्च, विद्युत खर्च करूनही बाग सुधारणा व आल्हाददायक वातावरण निर्मिती तेथे कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याचेही महापालिकेने कबुल केले आहे. शिवाय याचे कारण अकुशल कर्मचारी असल्याचेही स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशाने कायम झालेले कर्मचारी, वारसा-अनुकंपान्वये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना बाग सुधारणा, झाडे-फुले विकसित करणे व त्यांची जोपासना करणे, मोकळ्या जागेत लॉन लावणे, जंतूनाशक फवारणी अशा शास्त्रोक्त कामाचा अनुभव नाही व बरेचसे कर्मचारी अकुशल आहेत. उद्याने खासगी ठेकेदारास चालवायला दिली तर मनपाचा तेथे नियुक्त कर्मचारी वर्ग अन्य कामांसाठी वापरता येईल तसेच वीजबिल व देखभाल खर्च कमी होईल. तसेच ठेकेदार संस्थेकडून बाग सुधारणा व नवीन खेळण्या उपलब्ध झाल्यास नागरिक व लहान मुलांना त्याचा आनंद घेता येईल. त्यामुळे या सुविधा देताना संबंधित व्यवसाय संस्थेस नागरिकांकडून शुल्क आकारणीस मुभा द्यावी लागेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले असल्याने तसाच ठराव महासभेत आता अपेक्षित आहे.

या ठरावानुसार आता महालक्ष्मी व सिद्धीबाग या दोन मोठ्या उद्यानांसह गंगा उद्यान हे तिसरे मोठे उद्यान आणि अन्य ७ लहान उद्यानांमध्ये मातोश्री उद्यान (विनायकनगर), शाहूनगर उद्यान (केडगाव), कपिलेश्वर उद्यान (सारसनगर), विद्या कॉलनी उद्यान (कल्याण रोड), मातोश्री उद्यान (भुतकर वाडी), शिवतीर्थ उद्यान (भुतकर वाडी) व नाना-नानी पार्क (सन्मित्र कॉलनी) यांचा समावेश आहे. शहरातील उद्यानांच्या या खासगीकरणाचा ठराव स्थायी समितीने याआधीच मंजूर केला आहे व आता महासभेची अंतिम मंजुरी घेतल्यावर उद्यानांसाठी ठेकेदार शोधण्याची मोहीम मनपा प्रशासनाची वेगात सुरू होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post