नगरमुळे राज्यभरातील हमालही झाले कोरोना योद्धे; शासनाने दिले विमा संरक्षण


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाविरुद्ध प्रत्यक्ष लढणारे डॉक्टर-नर्स व वैद्यकीय स्टाफ व पोलिस जसे कोरोना योद्धे झाले आहेत, तसेच कोरोनाच्या महामारीत जनतेला विविध सेवा देणारे मनपा व शासकीय कर्मचारीही कोरोना योद्धे झाले आहेत. अशाच पद्धतीने अप्रत्यक्षपणे अडचणीत असलेल्या जनतेच्या सेवेत असलेल्या राज्यभरातील हमाल व माथाडी कामगारांचाही कोरोना योद्ध्यांमध्ये समावेश झाला असून, त्यांनाही राज्य सरकारद्वारे ५० लाखाचे विमा संरक्षण कवच दिले गेले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री दिलीप वळसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तसा निर्णय झाला असून, या निर्णयाचा शासन आदेश आता प्रतीक्षेत आहे. नगरच्या हमाल पंचायतीचे अध्यक्ष व मनपाचे नगरसेवक अविनाश घुले यांनी मागील चार महिन्यांपासून यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे व हमाल-माथाडी कामगारांनाही कोरोना महामारीच्या काळात जनतेची सेवा करीत असताना त्यांच्या जीवन सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यभरातील हमाल-माथाडी कामगारांना याचा लाभ होणार आहे. नगर जिल्ह्यातील दोन ते तीन हजारावर नोंदणीकृत हमाल-माथाडी कामगारांना असे विमा संरक्षण मिळणार आहे.

हमाल-माथाडी कामगार आडते बाजार, भुसार बाजार, भाजीपाला मार्केट, कांदा मार्केट, रेल्वे मालधक्का अशा विविध ठिकाणी शेतीमाल, धान्य, सिमेंट, खते गोण्या गाड्यांमध्ये चढवणे व उतरवण्याचे काम करतात. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांची अन्नधान्य़, भाजीपाला, खते वा अन्य अडचणी होऊ नयेत म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हमाल-माथाडी कामगार काम करीत असल्याने त्यांनाही कोरोना योद्ध्यांप्रमाणे ५० लाखाचे विमा संरक्षण मिळावे, यासाठी घुले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे, पणन मंत्री बाळासाहेब पाटील तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदने पाठवली होती. तसेच माथाडी मंडळाकडेही पाठपुरावा केला होता. राज्य माथाडी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्याकडेही या विषयाचा शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी घुले व बाबा आरगडे यांनी केली होती. त्या प्रयत्नांना यश येऊन मागील ९ जुलैला पुण्यात झालेल्या बैठकीत हमाल-माथाडी कामगारांनाही ५० लाखाच्या विमा संरक्षण योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे व लवकरच यासंदर्भातील शासन आदेश जारी होईल, अशी माहिती घुले यांनी दिली. 

नगर जिल्ह्याने व नगर जजिल्हा हमाल पंचायतीने यासाठी सर्वात प्रथम पाठपुरावा केल्याने सर्व राज्यभर याचा माथाडी कामगारांना लाभ मिळणार आहे. नगर जिल्ह्याच्या कष्टकरी कामगार लढ्याचे हे यश असून, राज्यातील माथाडी कामगारांना ५० लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. याआधीही हमालांच्या पाठीवर ५० किलोचे ओझे, लेव्ही, माथाडी कामगारांकडून होणारी व्यवसाय कराची कपात रोखण्यासारखे विषय नगरच्या हमाल पंचायतीमुळेच राज्यभर लागू झाले, असेही घुले यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post