हिवरे बाजारमध्ये रोज होणार राज्य घटनेचे वाचन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर जिल्ह्यातच नव्हे तर देशविदेशात लौकिक मिळवलेल्या व लोकसहभागातून ग्रामविकासाचा आदर्श निर्माण केलेल्या नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये रोज भारतीय राज्य घटनेचे वाचन होणार आहे. भारतीय संविधानाचे वाचन रोज एक तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोनाच्या नियमांचे व अटींचे पालन करून करण्यात येणार आहे. आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम होत आहे.

संविधान पारायणातून ग्रामस्थांना राज्य घटनेत नमूद नियम तसेच नागरिकांचे हक्क व आणि कर्तव्यांची माहिती विस्तृतपणे होणार आहे. हिवरे बाजारामध्ये हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यात हनुमान, राम, लक्ष्मण, सीता, श्रीविठ्ठल-रुक्मिणी, श्रीसंत ज्ञानेश्वर, श्रीसंत तुकाराम या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा लॉकडाऊन संपल्यानंतर करण्यात येणार आहे. मागील ४ महिन्यापासून कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन हिवरे बाजार ग्रामस्थांनी केल्यामुळे आजपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण गावात आढळला नाही. सध्या कोरोना आजाराने जगभर थैमान घातले असून टी.व्ही.वरील बातम्या बघून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव ग्रामीण भागातही झपाट्याने सुरू आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी हिवरे बाजार येथे रोज संविधान वाचन या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीसमोर संविधान वाचन झाल्यावर प्रत्येकाने स्वतःच्या घरात सकाळी, दुपारी व संध्याकाळी आपापल्या धार्मिक ग्रंथांचे विशेषतः साईचरित्र, हनुमान चालिसा, रामरक्षा, ज्ञानेश्वरी गाथा, गुरुचरित्र, ग्रामगीता, बौध्द तत्त्वज्ञान, कुराण, बायबल, नवनाथ गाथा यांचे पारायण करावे. यातून मनोबल वाढण्याचा प्रयत्न होणार असून ताणतणाव दूर होऊन आनंद मिळेल व कुटुंबातील स्नेहभाव वाढेल तसेच निष्कारण बाहेर फिरणेसुद्धा कमी होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post