नवे 'इम्पल्स' हॉस्पिटल करणार हृदयरोग व कोविड जनजागृती; रविवारी होणार उद्घाटन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
ह़ॉटेल व हॉस्पिटलचे शहर म्हणून नवा लौकिक मिळवलेल्या अहमदनगर शहरात नवे 'इम्पल्स सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटल सुरू होत आहे. नगर-मनमाड महामार्गावरील जुन्या सावेडी नाक्या समोर झालेल्या या नव्या हॉस्पिटलचे उदघाटन येत्या रविवारी (२ ऑगस्ट) नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे. या नव्या हॉस्पिटलमध्ये कोविड कक्ष केला जाणार असून, त्याद्वारे कोरोना आजाराबाबत जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय हृदयरोग, मेंदू व अस्थिविकार, नेत्रविकार यावरही अत्याधुनिक उपचार व आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, याबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे या हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. संदीप गाडे यांनी सांगितले.

हृदयविकार तज्ज्ञ असलेले डॉ. गाडे २०१३पासून नगरमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार करतात. त्यांनी तसेच मेंदू व मणकेविकार तज्ज्ञ डॉ. मुकुंद विधाते, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विजय गाडे यांनी इम्पल्स हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. यात त्यांना डॉ. बी. बी. शिंदे, डॉ. सुहास घुले, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. स्वाती घुले, डॉ. प्रशांत काळे व डॉ. अनिल मुरडे यांनी साथ दिली आहे. ६५ बेड (खाटा) असलेल्या या हॉस्पिटलमध्ये २२ बेडचा अतिदक्षता विभाग आहे. अँजिओप्लास्टीसाठी सुसज्ज कॅथलॅब, सिटीस्कॅन, रक्त चाचण्यांसाठी आधुनिक लॅब असून, येथे नेत्रोपचार, मेंदू व मणके विकार तसेच हृदयरोगावरील सर्व प्रकारचे उपचार सुविधा करण्यात आली आहे. रविवारी होणाऱ्या या हॉस्पिटलच्या उदघाटनास मंत्री तनपुरे यांच्यासह खा. डॉ. सुजय विखे, आ. अरुण जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे व आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित राहणार आहेत. कोरोनामुळे साधेपणाने व सोशल डिस्टन्सिंग पाळून उदघाटन समारंभ होणार असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post