३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कोरोना निर्बंध कायम; दुचाकीवर डबलसीट परवानगी, पण हेल्मेटही गरजेचे

 
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
गोल्‍फ  कोर्स, आउटडोअर फायरिंग रेज, जिम्‍नॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मल्‍लखांब अशा बिगर समूह बाह्य क्रीडा प्रकारांना ५ ऑगस्‍टपासून शारीरिक अंतर ठेवून (सोशल डिस्टन्स) व स्‍वच्‍छतेच्‍या उपाय योजनांसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जलतरण तलाव चालविण्‍यास परवानगी नाही. ३१ ऑगस्टपर्यंत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या असून, सायंकाळी सात ते पहाटे पाच या कालावधीत सार्वजनिक वावरावर निर्बंध कायम आहेत. दरम्यान, दुचाकीवर डबलसीट परवानगी देण्यात आली आहे. पण दोघांनाही हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.
 
फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ नुसार नगर जिल्‍हा हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास १ ते ३१ ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यासही प्रतिबंध कायम आहे. सिनेमा हॉल्‍स, व्‍यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृहे, प्रार्थना गृहे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी सार्वजनिकरित्‍या एकत्र येण्‍यास मनाई आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्‍थळे-प्रार्थना स्‍थळे नागरिकांच्‍या प्रवेशासाठी बंद राहतील. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर व फिरण्‍यावर सायंकाळी ७ ते पहाटे ५ या कालावधीत निर्बंध राहील. पासष्ट वर्षांपेक्षा जास्‍त वयोगटातील व्‍यक्‍ती, गर्भवती महिला व १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्‍यावश्‍यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्‍यास मनाई आहे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत. 
 
जी अत्‍यावश्‍यक दुकाने उघडण्‍यास मुभा देण्‍यात आली होती, ती सर्व दुकाने तशीच सुरू राहतील. शारीरिक अंतर ठेवून व स्‍वच्‍छतेच्‍या उपाययोजना करून प्रती बस कमाल मर्यादा 50 टक्के क्षमतेसह जिल्‍ह्यांतर्गत बस सेवा चालविण्‍यास परवानगी असेल. आंतरजिल्‍हा वाहतुकीचे, नियमितपणे विनियमन (ई-पास व्‍दारे) करण्‍यात येईल. सर्व बिगर-अत्‍यावश्‍यक बाजारपेठा-दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली राहतील.  मॉल्‍स आणि बाजार संकुले ( थिएटर वगळून)  ५ ऑगस्‍टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत खुले राहतील. मॉलमधील रेस्‍टॉरंट्स व फूड कोर्टसचे किचन यांना होम डिलिव्‍हरीची परवानगी असेल. शासनाने परवानगी दिल्‍याप्रमाणे मोकळ्या जागा, लॉन, बिगर वातानुकूलित सभागृह यामध्‍ये विवाहासंबंधीत समारंभाना परवानगी देण्‍यात येईल. निर्बंधासह मैदानी शारीरिक कसरती करण्‍यास परवानगी असेल. ई-मजकुराचा विकास, उत्तर पत्रिकेचे मूल्‍यांकन आणि निकाल जाहीर करणे, यासह बिगर शैक्षणिक कामे यासाठी शैक्षणिक संस्‍थांची (विद्यापीठ-महाविद्यालय-शाळा) कार्यालये तसेच कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना मुभा असेल. शासनाच्या परवानगीनुसार शर्तींसह केस कर्तनालये, स्‍पा, सलून, ब्‍युटी पार्लर उघडण्‍यास परवानगी असेल.

दुचाकीवर डबलसीट परवानगी, पण हेल्मेटही गरजेचे
सार्वजनिक आणि खासगी परिवहन व्‍यवस्‍था नियमितपणे प्रवासी व्‍यवस्‍थापन नियमानुसार सुरू राहणार आहेत. याअंतर्गत मास्‍कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकीवर १+१ हेल्‍मेट आणि मास्‍कसह, तीन चाकी - फक्‍त आवश्‍यक १+२, चार चाकी - फक्‍त आवश्‍यक १+३.

Post a Comment

Previous Post Next Post