चला.. लॉकडाऊन-लॉकडाऊन खेळू या..!

नगर बंदच्या चर्चेने किराणा व भाजी घेण्यास झुंबड, संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पूर्ण लॉक़डाऊन करण्याची चर्चा जोर धरू लागल्याने किराणा व भाजी खरेदीसाठी दोन दिवसापासून झुंबड उडाली आहे. शहर लॉकडाऊन करण्यासाठी राष्ट्रवादीने अनुकूलता दाखवल्यावर शिवसेनेने त्याला थेट विरोध न करता लॉकडाउनमधील त्रुटी मात्र दाखवून दिल्या आहेत. तर उद्योग-व्यापार व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. एकूणच नगरमध्ये आता लॉकडाऊन-लॉकडाऊन खेळ रंगात येण्याची चिन्हे आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या आता १०५२ झाली आहे. यात आतापर्यंत २६जणांचे मृत्यू झाले आहेत. ६५०वरजण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले असून आता ३६०वर रुग्ण उपचार घेत आहेत. मागील १५ दिवसांपासून नगर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त आहे. या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या एका बैठकीतील यासंदर्भातील वृत्त सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर १६ जुलैपासून २६ जुलैपर्यंतची लॉकडाऊनची तारीखही व्हायरल केली गेली. पण मनपा व जिल्हा प्रशासनाने याबाबत अजून कोणतेही अधिकृत आदेश जारी केलेले नाहीत. अर्थात त्यांच्याकडून संपूर्ण लॉकडाऊनचा विचार सुरू असल्याचेही स्पष्ट केले गेल्याने त्याआधारे शहरभर लॉकडाऊन चर्चेने जोर धरला आहे व किराणा आणि भाजी खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. लॉकडाउन काळात हाल होऊ नयेत, म्हणून आतापासूनच किराणा साहित्य व भाजीची बेगमी करून ठेवण्याची धडपड अनेकांची सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत मात्र संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
 • आडते बाजार मर्चंटस असोसिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी किमान १० दिवसांचे लॉकडाउन गरजेचे असल्याचे सांगितले. नगर शहरातील रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता तसेच सोशल डिस्टन्स पाळणे व मास्क वापरण्याबाबत नागरिकांकडूनही फारसे गांभीर्य बाळगले जात नसल्याने पूर्ण व्यवहार बंद करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 
 • व्यापारी प्रतिनिधी विपुल शहा यांनीही लॉकडाउन गरजेचा असल्याचे स्पष्ट केले. अर्थात अनेक शहरांतून लॉकडाउन केल्यानंतरही रुग्ण वाढीचा वेग कमी झालेला नाही, त्यामुळे नगरमध्ये आता लॉकडाउन केले तर त्याचा परिणाम रुग्ण संख्या वाढ रोखण्यात होईल असे नियोजन प्रशासनाचे असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 
 • उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनीही शहरातील रस्त्यांवर व काही दुकानांतून दिसणारी गर्दी व तेथे पाळले जात नसलेले सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता पूर्ण बंदचा लॉकडाउन आवश्यक असल्याचे मत मांडले. मात्र, बहुतांश मोठ्या शहरांतून लॉकडाउन करताना तेथील औद्योगिक क्षेत्र त्यातून वगळले होते. कंपन्यांतील कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामावर जाण्याची परवानगी होती, तशा पद्धतीने नगर एमआयडीसी या काळात सुरू ठेवली जावी, कामगार-कर्मचाऱ्यांना पास द्यावेत, असे त्यांनी सांगितले. 
 • लायन्स क्लबचे पदाधिकारी व उद्योजक हरजितसिंग वधवा यांनीही लॉकडाउन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. आताच्या घडीला पैसा व जीव यापैकी जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. शिवाय लोक ऐकतही नाहीत. मास्क लावत नाहीत, कारण नसताना घराबाहेर पडतात, विनाकारण फिरतात, सोशल डिस्टन्स पाळत नाहीत, त्यामुळे शहराच्या प्रत्येक भागात रुग्ण सापडत आहेत व त्यामुळे भीतीचे वातावरणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन गरजेचे आहे, औद्योगिक क्षेत्र त्यातून वगळले जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 • जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत देसाई यांनी लॉकडाउन काळात काही निर्बंध घालून व्यवहार सुरू ठेवणे गरजेचे असल्य़ाचे सांगितले. नगर शहरात हातावर पोट असलेल्यांची संख्या जास्त आहे, लॉकड़ाउन काळात कामधंदे बंद राहणार असल्याने त्यांचे जास्त हाल होणार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे, असे मुळे म्हणाले. तर छोटे-मोठे व्यापारी अडचणीत आहेत, व्यवसाय-व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत व दुसरीकडे कोरोना रुग्ण संख्याही वाढत आहेत. तीन व्यापाऱ्यांचे निधन झाल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचा वेग आटोक्यात येणे आवश्यक आहे व दुसरीकडे व्यावसायिक व्यवहारही काहीअंशी सुरू राहिले पाहिजे, त्यामुळे लॉकडाउन केले जावे व कडक निर्बंध घालून काहीअंशी व्यवहार सुरू राहावेत, अशी अपेक्षा देसाई यांनी व्य़क्त केली.

काही सुचवले गेले पर्याय
 • रस्त्यावर ऑड-एव्हन (सम-विषम) पद्धतीने दुकाने सुरू केली जावीत, आज एका बाजूची व उद्या दुसऱ्या बाजूची किंवा आज कापडाची दुकाने सुरू केली तर उद्या स्पेअरपार्टसची सुरू करावीत, परवा भांड्यांची, नंतर दागिन्यांची...अशा पद्धतीने दुकाने सुरू झाली व तेथे सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरणे सक्तीचे केले तर गर्दीवर नियंत्रण शक्य आहे.
 • रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येकाला मास्क कंपलसरी केला जावा व ज्याच्याकडे मास्क नसेल त्याला आर्थिक दंड केला जावा. शिक्षाही कडक केली जावी.
 • दुकानांतून होणारी गर्दी रोखण्यासाठी दुकान मालकाने सोशल डिस्टन्सिंग पाळणे सक्तीचे केले जावे, जेथे ते नसेल त्या दुकानावर कडक कारवाई करावी.
 • सोशल डिस्टन्स व मास्क वापरण्याबाबत व्यापक जनजागृती केली जावी व त्यासाठी पोलिसांसह शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके नेमली जावीत. तसेच गृहरक्षक दल व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींची तसेच मनपाचे नगरसेवक आणि विविध संस्थांवर पदाधिकारी असलेल्य़ांचीही मदत यासाठी घेतली जावी. प्रत्येक रस्त्यावरील प्रत्येक चौकात दिवसभर अशी पथके ठेवून मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे कठोर पालन केले जावे.
 • लॉक डाऊन करण्याआधी किमान 4 दिवस आधी तारीख जाहीर केली जावी, म्हणजे त्या काळात नागरिकांना काही प्रमाणात किराणा, भाजी व अन्य आवश्यक साहित्य पुरेशा प्रमाणात साठवून ठेवता येईल.
 • गरिबांसाठी प्रशासनानेच कम्युनिटी किचन सुरू करून त्यांना किमान एक वेळचे जेवण घरपोच पुरवले जावे. शिवभोजन फूड पार्सल स्वरूपात गरजवंतांना घरपोहोच दिले जावे.

Post a Comment

Previous Post Next Post