खासदार विखे-आमदार जगताप 'दोस्ती'ला बँकेचा अडथळा?


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी दोस्तीचा अध्याय नगरचा उड्डाणपुल होइपर्यंत सुरू राहणार असल्याचे नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलखुलासपणे जाहीर केले असले तरी या दोस्तीला येत्या सहा महिन्यातच अडथळा येण्याची शक्यता आहे व त्याला कारण जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ठरणार आहे. कोरोनामुळे बँकेची निवडणूक लांबणीवर पडली असून, ती डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यावेळी डॉ. विखे यांना आ. जगताप यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण, आ. जगताप यांचे वडील व विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप जिल्हा बँकेचे संचालक असून, ते सत्ताधारी थोरात गटाचे मानले जातात व या गटाशी विखे गटाचे अजिबात जमत नाही. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत आ. अरुण जगताप पुन्हा थोरात गटाकडून रिंगणात उतरले तर डॉ. विखे व त्यांचे वडील माजी विरोधी पक्ष नेते आणि आ. राधाकृष्ण विखे यांची भूमिका उत्सुकतेची असणार आहे.

नगरमध्ये केंद्र सरकारच्या निधीतून ३ किलोमीटरचा उड्डाण पुल सुमारे तीनशे कोटीवर रक्कम खर्च करून बांधला जाणार आहे. मागील १५-२० वर्षांपासून नगरचा उड्डाण पुल म्हणजे नगरकरांच्यादृष्टीने मृगजळ झाले आहे. पुण्या-मुंबईहून विदर्भ-मराठवाड्यात जाण्यासाठी नगर शहरातूनच जावे लागते. मात्र, यासाठीचा स्टेशन रस्ता पुरेसा रुंद नसल्याने येथे नेहमी बाहेरची व स्थानिक वाहतुकीची कोंडी होते, अनेक अपघात होऊन निष्पापांना जीव गमवावा लागला आहे, काही जखमी होऊन कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे स्टेशन रस्त्यावर उड्डाण पुल गरजेचा आहे. पण त्याचा वाढता खर्च, भूसंपादनास झालेला विलंब व राजकीय हेवेदावे यामुळे हा पूल १५-२० वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. आता हा पुल मंजूर होऊन ऑगस्टअखेरीस प्रत्यक्ष पुलाचे काम सुरू होईल, असा विश्वास खा. डॉ. विखे यांनी व्यक्त केला आहे व हा विश्वास व्यक्त करताना पुलासाठी नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचेही चांगले सहकार्य मिळाले असल्याने या पुलाचे काम होईपर्यंत पक्षीय राजकारण आणणार नाही व पुल उभारणीचा प्रकल्प पूर्ण झाल्यावरच आम्ही (विखे-जगताप) एकमेकांविरुद्ध प्रचार करू, असे डॉ. विखेंनी जाहीर करून टाकले. त्यांच्या या वक्तव्याला आ. जगताप यांनी हसून दाद देत, उड्डाण पुल नगरच्या विकासाचा व शहराच्या वैभवात भर घालणारा असल्याचे सांगून या दोस्तीला सहमतीही दाखवली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. विखे व आ. जगताप एकमेकांविरोधात उभे होते, त्यावेळी एकाकडून प्रचारात वापरले जात असलेले हेलिकॉप्टर दुसऱ्याने टीकेचे लक्ष्य केले होते तर महागड्या गाड्या वापरण्याचा दुसऱ्याचा शौक पहिल्याने चर्चेत आणला होता. एकमेकांवर यथेच्छ टीकाटिपणी त्या काळात दोन्ही बाजूंकडून झाली.

काँग्रेसमधून भाजपमध्ये जाऊन डॉ. विखेंनी लढवलेली ती निवडणूक व त्यांच्याविरोधात आ. जगताप यांनी दिलेली लढत त्यावेळी राज्यभरात गाजली होती. या निवडणुकीत विखेंनी जगतापांना मात दिली, पण त्यानंतर सहा महिन्यातच जगतापांनी नगर शहर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवून आमदारकी कायम राखली. बहुचर्चित विखे फॅक्टर त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसारखा नंतरच्या विधानसभा निवडणुकीत चालला नसल्याने जगतापांनी त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचा दुसऱ्यांदा पराभव केल्याची त्यावेळी चर्चा होती. कालांतराने या चर्चांचा धुराळा खाली बसला व महापालिकेत भाजपच्या महापौरांना शहर राष्ट्रवादीने त्या पदावर बसवले असल्याने त्याची कृतज्ञता म्हणून म्हणा वा अन्य काही कारणाने खा. डॉ. विखेंनी आ. जगतापांवर थेट टीका करणे बऱ्याचदा टाळले. आता तर उड्डाण पुलाचे काम होईपर्यंत आ. जगतापांच्याविरोधात प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट करून विरोधाच्या तलवारी म्यान करून दोस्तीचा नवा अध्याय सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. नगर शहरातील व महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादीच्या दोस्तीच्या राजकारणाला पूरक अशी भूमिकाच डॉ. विखेंनी जाहीरपणे मांडली आहे. पण या भूमिकेला सहा महिन्यातच छेद देण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

नगर शहरात कोणतीही मोठी निवडणूक येत्या एक-दोन वर्षात नाही. महापालिकेची पुढची निवडणूक साडेतीन वर्षांनी आहे तर पुढची लोकसभा चार वर्षांनी व विधानसभा साडेचार वर्षांनी होणार आहे. तोपर्यंतच्या काळात उड्डाण पुल अडीच वर्षात होऊन जाईल व त्यामुळे जगतापांशी पुलासाठी जाहीर केलेल्या दोस्तीला कोणताही राजकीय अडथळा वा निवडणुकीचा अडथळा येणार नाही, अशी डॉ. विखेंची अटकळ असली तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र विखे-जगतापांना एकमेकांविरोधात विरोधाचे सूर आळवावे लागणार आहेत. मे २०२० मध्ये प्रस्तावित असलेली जिल्हा बँकेच्या २१ सदस्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक कोरोनामुळे सप्टेंबर २०२०पर्यंत पुढे ढकलली गेली आहे व ती आणखी पुढे डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. या निवडणुकीत विखेंचे पारंपरिक विरोधक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व होऊ नये म्हणून विखेंकडून स्वतंत्र पॅनेलद्वारे विरोध नक्कीच होणार आहे. त्या निवडणुकीत थोरात गटाकडून आ. अरुण जगताप बँकेच्या निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर विखेंना त्यांना विरोध करावा लागेल. त्यावेळी खा. डॉ. विखेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जगतापांशी जाहीर केलेली दोस्ती ते त्यावेळी निभावतील की नाही, याचीच उत्सुकता आतापासूनच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post