महापालिकेचे कामकाज उद्यापासून सुरळीत होणार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कार्यालयात काही दिवस नागरिकांना येण्यास प्रतिबंध घालावा\ तसेच मुख्यालयातील सर्व कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी बंद असलेले महापालिकेचे कामकाज उद्यापासून (दि. 16) नियमितपणे सुरू होणार आहे.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज सकाळीच सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त व कामगार युनियनची बैठक घेतली. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे म्हणाले, सर्वच कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करण्यापेक्षा रॅपिड टेस्ट करण्यात यावी. तसेच पल्स ऑक्स आणि थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे. एवढीच आमची मागणी आहे. या तीन टेस्ट केल्यानंतर ज्यांची आवश्यकता आहे अशाच कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट करावी, असे आम्ही प्रशासनाला सुचविले आहे.

कर्मचार्‍यांच्या मागणीनुसार त्यांची आरोग्य तपासणी गुरुवारी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेच सुरू करण्यात येईल. प्रवेशद्वारावर एका लिपिकाची नियुक्ति केली जाणार आहे. येणाऱ्या व्यक्तीचे काम महत्वाचे असेल तयाच फ़क्त संबंधित व्यक्तीला मनपा कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. मागणी मान्य झाल्यामुळे कामगार युनियननेही गुरुवारपासून सर्व कर्मचारी कामावर येतील, असे सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post