अहमदनगर : सत्तापक्षांतील संघर्ष जिल्हाभरात चर्चेत


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये राज्याच्या स्तरावर सहमती असली तरी स्थानिक नगर जिल्ह्याच्या स्तरावर मात्र जोरदार संघर्ष सुरू आहे. पारनेरला सेनेचे ५ नगरसेवक राष्ट्रवादीत घेतल्यानंतर त्यांना पुन्हा स्वगृही पाठवण्याचा विषय राज्यभर गाजल्यावर आता नगर शहरातील तपोवन रस्ता कामाच्या निकृष्टपणावरून सेना-राष्ट्रवादीत संघर्ष सुरू आहे. अगदी वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तपोवन रस्त्याच्या निकृष्टतेची तपासणी सुरू असून, त्याचा अहवाल व पुढील कारवाई अजून प्रतीक्षेतच आहे. पण या निकृष्टतेला जबाबदार कोण यावरून नगरमधील सेना व राष्ट्रवादीचे रणकंदन रंगात आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत, एवढेच नव्हे तर यानिमित्ताने मागच्या काळात झालेले गैरव्यवहारही उकरून काढले गेल्याने शहरात सेना-राष्ट्रवादीचा संघर्ष जिल्हाभरात चर्चेचा झाला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन सात-आठ महिने झाले आहेत. सेना-राष्ट्रवादीची राज्यस्तरीय मैत्री तेव्हापासून सुरू झाली आहे. पण त्याआधी काही वर्षांपासून पारनेर व नगरमधील सेना-राष्ट्रवादीचा संघर्ष सुरू आहे. पारनेरला शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे कधीकाळी समर्थक असलेले विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यात व दोघांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू आहे तर नगरला शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू आहेत. पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर राज्यात गदारोळ झाल्यावर राष्ट्रवादीने या पाचही नगरसेवकांना सेनेला साभार परत केले. आता या नगरसेवकांमुळे पारनेर सेनेंतर्गत वादावादी सुरू आहे. या प्रकरणाचा धुराळा राज्यभर उडाला. राज्यात सत्तेत असलेल्या सेना-राष्ट्रवादीच्या मैत्रीला त्यामुळे झळा बसल्या व यापुढे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनी एकमेकांची माणसे फोडायची नाहीत, असा अलिखित करार झाल्याचे सांगितले जाते. पण यानिमित्ताने एकमेकांचे गैरव्यवहार बाहेर काढायचे की नाही, यावर मात्र मंथन झालेले दिसत नाही.

पारनेरचा फोडाफोडीचा धुराळा खाली बसत नाही तोच नगरमध्ये सेना-राष्ट्रवादीचा संघर्ष टीपेला पोहोचण्याच्या मार्गावर आहे. मागील भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या तपोवन रस्त्याच्या कामावरून हा संघर्ष सुरू आहे. सुमारे ४ किलोमीटर अंतराचा हा रस्ता औरंगाबाद व मनमाड या महामार्गांना जोडणारा आहे व त्यामुळे नगरकरांना खूप सोयीचे होऊन शहरांतर्गत वाहतुकीची मोठी अडचण दूर होणार आहे. सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्चून हा रस्ता होत आहे. पण त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा दावा शिवसेना व राष्ट्रवादीने केला आहे आणि या निकृष्टतेसाठी एकमेकांना जबाबदार धरले आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचा भडीमार एकमेकांवर सुरू आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून आम्ही साधा चहाही प्यायलेलो नाही, तपोवन रस्ता आम्हीच मंजूर करून आणला व त्याला त्यावेळी शिवसेनेनेच विरोध केला होता तसेच या रस्त्याच्या निकृष्टतेबद्दल आम्हीच वेळोवेळी तक्रारी केल्याने त्याची तपासणी सुरू झाली, असा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आहे तर राष्ट्रवादी नगरसेवकांचे कामापेक्षा दामाला महत्त्व असल्याचे व आम्हीच सरकारकडे तक्रार करून या रस्त्याच्या कामाची चौकशी लावली असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

तपोवन रस्त्याच्या निकृष्टतेच्या चौकशीवरून सुरू असलेला वाद आता जुन्या काही प्रकरणावरून व वैयक्तिक स्तरावर सुरू झाला आहे. त्यामुळेच तो चर्चेत आला आहे. राज्यात सेना-राष्ट्रवादी व काँग्रेस सत्तेत असली व भाजप त्यांचा विरोधक असला तरी नगरच्या स्तरावर राष्ट्रवादी व भाजपचे सख्य आहे व त्यांचा विरोधक सेना आहे. राज्यात मैत्री व नगरमध्ये मात्र दुश्मनीसारखे चित्र आहे व ते यापुढेही सुरू राहण्याचीच चिन्हे आहेत. मात्र, त्यानिमित्ताने पारनेर व नगरमधील सेना-राष्ट्रवादीचे वादावादीचे व एकमेकांना विरोध करण्याचे संबंध राज्यात मात्र चर्चेचे ठरू लागले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post