भूखंडाच्या श्रीखंडासाठी सावेडी कचरा डेपो बंद करणार; सेना नगरसेवक बोराटेंचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेत सत्तेत व विरोधात असलेल्या धनाढ्य बिल्डरांनी कवडीमोल भावाने सावेडी कचरा डेपोच्या आसपास जमिनी मोठ्या प्रमाणात विकत घेऊन ठेवल्या आहेत व महापालिकेने जर कचरा डेपो येथून हटवला तर या जमिनींच्या किमती १००पटींनी वाढतील व भूखंडाचे श्रीखंड करून खाता येईल असा त्यांचा डाव आहे, असा आरोप महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे. २९ जुलैच्या महासभेत प्रस्तावित करण्यात आलेला सावेडी कचरा डेपो हटवण्याचा विषय रद्द केला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना पत्र पाठवून दिला आहे.

सावेडीतील मनपाचा कचरा डेपो हटवून तेथे स्मशानभूमी, उद्यान व मल्टीपर्पज क्रीडा संकुल विकसित करण्याचा विषय महासभेसमोर घेण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावास शिवसेनेचा विरोध असल्याचे बोराटेंनी स्पष्ट केले आहे. सध्या कोरोनाच्या आपत्तीचा काळ असताना त्याअनुषंगाने नागरिकांना आवश्यक सुविधांचे विषय अपेक्षित असताना हा भांडवली खर्चाचा विषय आपत्ती काळात आयोजित तातडीच्या सभेत चर्चेला घेणे बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भूखंडावर कचरा डेपोचे आरक्षण असताना ते उठवले जाऊ शकत नाही तसेच कचरा कुंडीच्या जागेवर स्मशानभूमी बांधल्यास नागरिकांच्या भावना दुखावल्यासारखे होणार आहे, असेही म्हणणे त्यांनी मांडले आहे.  सावेडी कचरा डेपोत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व खतेनिर्मिती प्रकल्पासाठी मनपातर्फे तेथे रस्ते, पथदिव्यांसह अन्य सुविधांची कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे केली गेली आहेत. महासभेसमोर आलेल्या विषयात या भूखंडावर मल्टीपर्पज क्रीडा संकुल बांधण्याचा प्रस्ताव आहे. परंतू निधीअभावी सावेडीतील क्रीडा संकुल अद्याप महापालिकेकडून बांधून पूर्ण झालेले नाही.  चितळे रोडवरील पाडलेल्या नेहरू मार्केटच्या जागेवर निधी अभावी महापालिका भाजी मंडई व व्यावसायिक संकुल बांधू शकलेली नाही, असे वास्तव बोराटेंनी या पत्रात मांडले आहे. सावेडी कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी व मल्टीपर्पज क्रीडा संकुल बांधण्यासाठी मनपाला पैसा कसा उपलब्ध होणार? असा त्यांचा सवाल आहे.

सावेडीत कचरा डेपो नेण्याचा विषय ज्यावेळी झाला, त्यावेळी आता डेपो हटवण्याचा विषय देणारांचीच सत्ता होती. त्यावेळी त्यांनी अनेकांचा विरोध असताना कचरा डेपो तेथे नेला. आता या डेपोच्या विकासासाठी महापालिकेने कोट्यवधीची कामे केली असताना तो हटवण्यास त्यांनीच पुढाकार घेतला आहे. २० जुलै रोजी मनपा विरोधीपक्षनेते यादी देतात. त्यात कचरा डेपो हटविण्याचा विषय येतो. २१ जुलै रोजी आयुक्त या विषयाला मंजुरी देतात व २२ जुलै रोजी नगर सचिव विभागाकडून काढण्यात आलेल्या २९ जुलैच्या ऑनलाइन महासभेच्या अजेंड्यात हा विषय अंतर्भुत केला जातो, या मागचे गौडबंगाल सर्वांना माहीत आहे, असा दावाही बोराटेंनी केला आहे. त्यामुळे ऑनलाईन महासभेत हा बेकायदेशीर विषय मंजूर झाला, तर त्याबाबत पोलिस प्रशासन व न्याय व्यवस्थेकडे दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  जळगाव घरकुल योजनेमध्ये ज्याप्रमाणे नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले, तसेच गुन्हे नगर मनपाच्या नगरसेवकांवर या विषयामुळे दाखल होऊ शकतात. मात्र, त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे बोराटे यांनी म्हटले आहे. बुरुडगाव कचरा डेपोवर तेथील ग्रामस्थ फक्त बायो मेडीकल वेस्ट डंम्पींगसाठीच मनपाच्या कचरा गाड्यांना गावातून वाहतुकीस परवानगी देतात. अशा स्थितीत सावेडीतील कचरा डेपो इतरत्र हलविल्यास शहरातील कचरा डंपींगचा प्रश्न उद्भवू शकतो, असा दावाही बोराटेंनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post