सावेडी डेपोचे स्थलांतर राष्ट्रीय हरित लवादात नेणार; कुलट यांनी दिला इशारा

 
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : सावेडीचा कचरा डेपो बंद करून नगर शहरातील सर्व कचरा बुरुडगावला नेण्याचा महापालिकेचा विचार बेकायदेशीर असल्याने हा विषय राष्ट्रीय हरित लवादात नेणार असल्याची माहिती बुरुडगाव कचरा डेपो बंद करावा म्हणून राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केलेल्या राधाकिसन कुलट यांनी दिला आहे. दरम्यान, बुरुडगाव कचरा डेपो बंद करण्याची मागणी बुरुडगाव ग्रामस्थानी केली असून, सावेडीचा कचरा डेपो बंद करण्याचा निर्णय २९ जुलैच्या मनपाच्या ऑनलाइन महासभेत झाला तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

सावेडीचा कचरा डेपो बंद करून तो बुरुडगाव कचरा डेपोवर हलवणे म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा अवमान असल्याचा दावा कुलट यांनी केला आहे. बुरुडगाव कचरा डेपो येथे १०० टनी व सावेडी कचरा डेपोत ५० टनी कचऱ्यातून खत निर्मितीचे प्रकल्प करण्याचे लवादाचे आदेश आहेत. मात्र, सावेडीचा कचरा डेपो बंद करताना तेथे प्रस्तावित असलेला ५० टनी कचऱ्यातून खत निर्मितीचा प्रकल्प बुरुडगावला स्थलांतरित करणे म्हणजे लवादाच्या आदेशाचा अवमान ठरणार असल्याने लवादासमोर हा विषय नेला जाणार आहे, असे कुलट यांनी सांगितले. बुरुडगाव कचरा डेपोत सध्या रोज १०० टन कचरा येतो तसेच येथे न कुजणारा कचरा डम्प करण्यासाठीचा ५५ मीटर बाय ९० मीटरचा प्लॅटफॉर्म पूर्ण भरला गेला आहे. त्यात आता नव्याने ५० टनी कचऱ्यातून खत निर्मितीचा प्रकल्प येथे करणार असाल तर तो येणारा कचरा कोठे टाकणार, असा सवाल करून कुलट म्हणाले, कचरा उघड्यावर टाकायचा नसल्याचे हरित लवादाचे आदेश असल्याने आधी बुरुडगाव डेपोवर येऊन पाहणी करावी व कचरा कोठे टाकणार हे स्पष्ट केल्याशिवाय सावेडी कचरा डेपो बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेऊ नये, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

 दरम्यान, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अरुण शिंदे, जालिंदर वाघ, जालिंदर कुलट, माजी नगरसेविका कांताबाई शिंदे आदींनी महापालिकेला निवेदन देऊन सावेडीचा कचरा बुरुडगावला आणण्यास विरोध केला आहे. शहरामध्ये कुठेही कचरा कुंडी ठेवण्यास विरोध होत असताना बुरुडगाव ग्रामस्थ मात्र मनपाच्या कचर्‍यापासून त्रस्त आहेत. प्रदुषणामुळे येथील शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. बुरुडगाव साथीच्या रोगांना बळी पडत आहे व जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रकल्पास स्थलांतरास बुरुडगावकरांचा विरोध आहे. त्यामुळे निवेदनाचा गंभीर विचार करून संबंधित विषय महासभेतूनच वगळावा, अन्यथा बुरुडगांवकर आंदोलन हाती घेतील, असेही निवेदनात म्हटले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर २९ रोजीच्या ऑनलाइन महासभेत सावेडी कचरा डेपो बंद करणे तसेच सावेडी कचरा डेपोतील प्रस्तावित ५० टनी कचऱ्यातून खत निर्मितीचा प्रकल्प बुरुडगावला स्थलांतरित करण्याच्या दोन विषयांवरील निर्णय कुतूहलाचे झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post