अहमदनगर : 'सावेडी' होणार मुक्त.. 'बुरुडगाव' ठरणार आधार


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सावेडीकर आता मुक्त होणार आहेत. मात्र, त्याचवेळी बुरुडगावकर मात्र नगरकरांसाठी आधार ठरणार आहेत. सावेडीचा कचरा डेपो हटवण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, येत्या २९ जुलैच्या महापालिकेच्या ऑनलाइन महासभेत तसा ठराव होणार आहे. त्यानंतर सावेडी कचरा डेपो बंद होऊन तेथील कचरा पर्यायी डेपोकडे नेला जाणार आहे. सध्याच्या स्थितीत तरी सावेडी डेपो बंद केल्यावर सावेडी परिसरातच नवीन पर्यायी डेपो नसल्याने नगरचा सारा कचरा बुरुडगावच्या मनपाच्या कचरा डेपोवर नेला जाणार आहे. सावेडीकर कचऱ्याच्या त्रासापासून मुक्त होणार असले तरी बुरुडगावकर मात्र साऱ्या नगरचे आधार ठरणार आहेत. अर्थात, सावेडीचा कचरा डेपो बंद करून बुरुडगावला सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपातील सत्ताधारी भाजप व त्यांना ताकद देणाऱ्या राष्ट्रवादीने निर्णय घेतला असला तरी या सत्तेचे विरोधक असलेल्या शिवसेनेकडून काय भूमिका घेतली जाते, तसेच बुरुडगावचे रहिवासी हरित लवादात बुरुडगावचा कचरा डेपो बंद करण्याबाबत गेले असल्याने त्यांची 'सावेडीचा कचरा बुरुडगावला' या नव्या बदलाबाबत काय भूमिका राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

नगर शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन तसेच सावेडी परिसर झपाट्याने विकसित होत असल्याने या भागातील कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने तपोवन रस्त्याजवळील १५ एकर जागेत २०१४ पासून कचरा डेपो सुरू केला आहे. बुरुडगाव कचरा डेपोमध्ये कचऱ्यातून खत निर्मितीचा प्रकल्प बंद असल्याने नगर शहरातील व सावेडी परिसरातील कचरा सावेडी डेपोवर येतो व तेथे सुरू असलेल्या कचऱ्यातून खत निर्मितीच्या १०० टनी प्रकल्पाद्वारे प्रक्रिया होते. सावेडी कचरा डेपो झाल्यानंतर सुरुवातीला या भागात येणारा कचरा कमी प्रमाणात होता. मात्र, नंतर कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने तसेच त्यावर प्रक्रिया करण्याकडेही महापालिकेने फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने २०१८ पासून सावेडी कचरा डेपो हटवण्याची मागणी होत आहे. या दरम्यान मनपाने येथे अंतर्गत रस्ते, कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच न कुजणारा कचरा जमिनीखाली डम्प करण्यासाठी लँडफिल्ड साईट विकसित केली आहे. मात्र,  मे २०१८ व एप्रिल २०१९ मध्ये अशा दोन मोठ्या आगी या डेपोत लागल्या. कचऱ्याच्या धुराचे लोटच्या लोट सावेडी परिसरावर होते. त्यानंतर सावेडीचा डेपो हटवण्याच्या मागणीला वेग आला. जून २०१९ मध्ये राष्ट्रवादीने यासाठी महापालिकेत आंदोलन केले, त्यावेळी महिनाभरात डेपो हटवण्याचे आश्वासन त्यांना मिळाले. त्या आश्वासनाला मुहूर्त तब्बल एक वर्षाने आता मिळाला आहे. मनपाचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी सावेडी कचरा डेपो हटवून तेथे सावेडीसाठीची अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेली स्मशानभूमी, सर्व सुविधांनी युक्त उद्यान व मल्टीपर्पज क्रीडा संकुल करण्याचा विषय मांडला आहे. २९ जुलैच्या महासभेत हा विषय मंजूर होण्याची शक्यता आहे. परिणामी, आता सावेडी डेपोतील कचरा हटणार व सावेडीकर कचरा दुर्गंधीतून मुक्त होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच सावेडी कचरा डेपोमध्ये मंजूर असलेला नवा ५० टनी कचऱ्यातून खत निर्मितीचा सुमारे दीड कोटी रुपये खर्चाचा प्रकल्पही सावेडीऐवजी आता बुरुडगाव कचरा डेपोवर स्थलांतरित करण्याचा विषयही २९ जुलैच्या महासभेत असल्याने व तोही मंजूर होणार असल्याने सावेडी कचरा डेपो हलवण्याच्या निर्णयावर ते शिक्कामोर्तबच ठरणार आहे.

बुरुडगावकर व शिवसेनेची भूमिका महत्त्वाची
बुरुडगाव येथे महापालिकेचा कचरा डेपो खूप जुना आहे. या डेपोमुळे प्रदूषण वाढते, परिसरातील जमिनी नापीक झाल्या आहेत, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे, अशा तक्रारींच्या आधारे बुरुडगावच्या रहिवाशांनी राष्ट्रीय हरित लवादात दावा दाखल केला आहे. लवादाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेने या डेपोत विविध विकास कामे केली व काहींची निर्मिती सुरू आहे. लवादाच्या आदेशाने मनपाने कचऱ्यातून खत निर्मिती करणारा नवा प्रकल्प, बेवारस जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठीची विद्युत दाहिनी, जुना कचरा हटवून जागा मोकळी करण्याचे बायोमायनिंगचे काम, हॉटेलांतील व्हेज-नॉनव्हेज वेस्ट मटेरियलवर प्रक्रिया करणारा बायोमिथेनेशन प्रकल्प अशी कामे येथे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या लवादाच्या सुनावणीत मनपाचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने लवादाने या डेपोमुळे बुरडगाव परिसरात झालेल्या प्रदूषण हानीचा अहवाल देण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सावेडीचा कचरा डेपो बंद करून शहरातील पूर्ण कचरा बुरुडगावच्या डेपोत नेण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर बुरुडगावचे रहिवासी काय भूमिका घेतात, तसेच मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या या निर्णयाला शहर शिवसेना विरोध करते की आळीमिळी गुपचिळी घेते, हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post