ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने रुग्णाला टेम्पोतून हलविले; नगर शहरातील प्रकार


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर शहरात व जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे, सर्व सुविधा उपलब्ध आहे, असे पालकमंत्र्यांनी आजच स्पष्ट केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रुग्णाला ॲम्ब्युलन्स न उपलब्ध झाल्यामुळे चक्क मालवाहू टेम्पोमधून नेण्यात आल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील एका खासगी रुग्णालया बाहेरील हा फोटो असल्याचे दिसून येते. टेम्पोत एका रुग्णाबरोबर पीपीई कीट घातलेली व्यक्ती छायाचित्रात दिसत आहे. सदरची कोरोना बाधित व्यक्ती असल्याचा व ती मनपा कर्मचारी असल्याचा दावाही या संदेशात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना शहरात रुग्णांची हेळसांड सुरु असल्याचा आरोपही या संदेशात करण्यात आला आहे.

या प्रकाराशी महापालिकेचा संबंध नाही : डॉ. बोरगे
महापालिकेने रुग्णांच्या व्यवस्थेसाठी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. सदरचा प्रकार महापालिकेच्या रुग्णालयातील अथवा कोविड सेंटरमधील नाही. महापालिका यंत्रणेचा या प्रकाराशी संबंध नाही. अशा पद्धतीने टेम्पोतून रुग्णांना घेऊन जाणे चुकीचे आहे. या प्रकाराची माहिती मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्याकडून मिळाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याची वेळीच दखल घेउन रुग्णाला उपचारासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करुन दिली, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली. दरम्यान, सदर रुग्णाला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज घेउन खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे जागा न मिळाल्याने हा प्रकार घडला, असे सांगितले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post