गुडन्यूज....धरणांत वाढतोय पाणीसाठा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या जिल्ह्यातील तीन प्रमुख धरणांतील पाणीसाठा हळूहळू वाढतो आहे. मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीपातळी वाढत आहे. सुमारे ११ हजार दशलक्ष घनफुट क्षमतेच्या भंडारदरा धरणात आता ४६ टक्के, ८ हजार दशलक्ष घनफुट क्षमतेच्या निळवंडे धरणात तब्बल ५३ टक्के व २६ हजार दशलक्ष घनफुट क्षमतेच्या मुळा धरणात सुमारे ४० टक्के पाणीसाठा आताच्या घडीला आहे. पावसाळ्याचे अजून किमान दोन महिने बाकी असून या काळात मुबलक पाऊस झाला तर ही तिन्ही धरणे भरण्याची आशा आहे.

मुळा धरणाने राहुरी, नेवासे, शेवगाव व नगर शहरासह नगर ग्रामीण भागाच्या विकासात योगदान दिले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणाने उत्तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या तालुक्यांना हिरवेगार केले आहे. समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार या धरणांतील पाण्यापैकी काही पाणी पैठणच्या जायकवाडी धरणासाठी सोडावे लागते. या पाणीवाटपाबाबत मराठवाड्यातून आग्रही मागणी असते तर नाशिक व नगरच्या स्तरावर जोरदार विरोध नेहमीच असतो. दुष्काळाच्या काळात या पाणीवाटपाचे राजकारणही रंगत असते. सध्या मात्र मागील वर्षीपासून पावसाचे प्रमाण राज्यात सगळीकडेच चांगले असल्याने पाणीवाटपाचा विषय दुर्लक्षित झाला आहे. यंदाही जूनपासूनच पावसाने बऱ्यापैकी अस्तित्व दाखवायला सुरुवात केल्याने धरणांतून नव्या पाण्याची आवक जोरात सुरू आहे. परिणामी, धरणांतील पाणीपातळीही वाढत आहे. जिल्ह्याच्या शेती विकासाच्यादृष्टीने तसेच शहरी भागाला पिण्याच्या पाण्याच्या मुबलक उपलब्धतेच्यादृष्टीने धरणांतून येणारे नवे पाणी समाधान देऊ पाहात आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा असा- (१ जून २०२०पासून ते २५ जुलै सकाळी ६ वाजेपर्यंत). पाणी साठा (दशलक्ष घनफूट व टक्केवारी)-१) भंडारदरा-५०६८ (४५.९१%), २)निळवंडे-४३६४(५२.४५%), ३)मुळा-१०२६४ (३९.४८%), ४)आढळा-४२४ (४०.००%), ५) भोजापूर-८० (२२.१६%). पाण्याची नवीन आवक- (२५ जुलैला व आजपर्यंत एकूण-दशलक्षघनफूट (टीएमसी)-१)भंडारदरा)-६४/३१९५, २)निळवंडे-०५/२५०७, ३)मुळा-३६६/३६४९, ४)आढळा-२१/४५.

Post a Comment

Previous Post Next Post