नगरकर कोरोनाला हरवणार.. शहर युवक काँग्रेसने हाती घेतले 'मिशन पॉझिटिव्ह सोच' अभियान


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
"माणूसकी जपत एकमेकांना मदत करणार, आम्ही नगरकर कोरोनाला हरवणार" असे घोषवाक्य घेऊन शहर युवक काँग्रेसच्यावतीने 'मिशन पॉझिटिव्ह सोच' अभियान १ ऑगस्टपासून सात दिवस नगर शहरात राबवले जाणार आहे.  युवक काँग्रेस, 'एनएसयूआय'चे जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्या संकल्पनेतून हे अभियान हाती घेण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या अभियानामध्ये रोज विविध घटकातील तज्ज्ञ सोशल मीडियाद्वारे नगर शहरामधील नागरिकांना व्हिडिओच्या माध्यमातून सकारात्मक संदेश देणार आहेत. स्वतःचे अनुभव सांगत जनजागृती करणार आहेत.

सामान्य नागरिक, अधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कोरोनाच्या संकट काळामध्ये आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे पाहिले पाहिजे, संकटावर कशा प्रकारे मात केली पाहिजे, एकमेकांना आधार देत कसे पुढे गेले पाहिजे, स्वतःचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून नगरकरांना प्रेरित करण्याचे, त्याचबरोबर जनजागृती करण्याचे काम करणार आहेत. यामध्ये नगर शहरातील सफाई कामगार, बँक कर्मचारी, वर्तमानपत्र घरोघर जाऊन टाकणारे पेपर विक्रेते, परप्रांतीय नगरकर, विविध धर्मांचे धार्मिक गुरु, सीए, फिटर, दूध डेअरी चालक, कोरोनावर मात करून बरे झालेले नगरकर, कोरोना झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय, वकील, कलाकार, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला, हॉटेल व्यवसायिक, व्यापारी,  उद्योजक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवक-युवती, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, कटिंग सलून चालक, पेट्रोल पंप कामगार, डॉक्टर, मेडिकल चालक, वॉर्डबॉय, नर्स, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानदार, कोवीड हॉस्पिटल चालक, पोलीस प्रशासन, रात्री सात नंतर चौका-चौकात उभे राहून काम करणाऱ्या पोलिस पथकातील कर्मचारी यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर पाटोळे, मुबीन शेख, योगेश काळे, अन्वर सय्यद, गणेश भोसले, डॉ. साहिल पटेल, अमन तिवारी, सुजय गांधी, दीपक घाडगे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post