निंबळक बाह्यवळण ते बोल्हेगाव रस्त्याची शासनाच्या पथकाने केली पाहणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
शहरातील सावेडी गावातील बालिकाश्रम रस्त्यापासून सुरू होणाऱ्या बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्याच्या कामाची आज महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेच्या पथकाने या रस्त्याची पाहणी केली. यावेळी तक्रारदार प्रमोद मोहोळे व नगरसेवक कुमार वाकळे उपस्थित होते.

बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्याचे कामही तपोवन रस्त्याच्या बरोबरीने झाले होते. सावेडी उपनगर, बोल्हेगाव व नागापूर परिसराचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार जगताप यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हा रस्ता व तपोवन रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक अभियानातून निधी आणला होता. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता खराब झाल्याचे स्थानिक नगरसेवक व आमदार संग्राम जगताप यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यासह प्रमोद मोहोळे यांनी या संदर्भात तकरार केली होती. त्यानुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेचे तीन सदस्यीय पथक सोमवारी शहरात दाखल झाले. यात वरिष्ठ राज्य गुणवत्ता निरीक्षक एस.ए. चौधरी यांच्यासह एच.आर. रंधीर व ए.डी. पेशवे यांचा समावेश आहे.

या पथकाने काल तपोवन रस्त्याची पाहणी केली. आज या पथकाने बोल्हेगाव ते निंबळक बाह्यवळण रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील डांबराचे काही नमुने पथकाने घेतले. तसेच खड्डे बुजविण्याचे व या रस्त्याचे दर्जेदार काम होईपर्यंत ठेकेदाराची बिले अदा करून नयेत असे आदेश या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post