![]() |
याच तपोवन रस्त्यावरून सध्या राजकारण रंगले आहे. |
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : तपोवन रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे आम्ही साध्या चहाचेही लाजिणदार नाही, त्यामुळे आमच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्यांनी मनपातील बाबू चोरडिया कोणामुळे व कशामुळे गेला तसेच तुमच्या झालेल्या रस्ता पाहणीच्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तुमच्या बरोबर का नव्हते, याचा खुलासा करावा, असे आव्हान नगर मनपाच्या वॉर्ड १, २ व ७च्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड व माजी महापौर अभिषेक कळमकर यांना त्यांची नावे न घेता दिले.
सावेडीतील सुमारे ४ किलोमीटरचा तपोवन रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत आहे व त्यावर ३ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहे. पण या रस्त्याचे झालेले काम निकृष्ट झाल्याने त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांद्वारे सध्या तपासणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी व शहर शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. मनपाचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरुडे तसेच माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे राठोड व कळमकर यांची नावे न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
तपोवन रस्ता मंजूर केल्याचा त्यांचा (शिवसेना) दावा असला तरी त्यात तथ्य नाही. २२ वर्षे हा रस्ता वाहतुकीस बंद होता व त्या काळात शिवसेनेचा २५ वर्षे आमदार शहरात होता. त्यांनी त्यांच्या काळात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला का केला नाही, असा सवाल नगरसेवकांनी केला. आ. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर करून आणल्यावर मनपात शिवसेनेनेच या कामाला विरोध केला व हा रस्ता मनपा निधीतूनच करावा, असा आग्रह धरला. अखेर जिल्हा परिषदेने हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचे सांगितल्यावर मनपाने आग्रह सोडला, असे सांगून नगरसेवक म्हणाले, विरोधकांकडून कल्ला करून गल्ला गोळा करण्याचे उद्योग सुरू आहेत, फक्त ब्लॅकमेलिंगसाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून त्यातील त्रुटी आम्ही दाखवून दिल्या होत्या, काहीवेळा काम बंदही पाडले आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून आम्ही साधा ५ रुपयांच्या चहाचेही लाजिणदार नाहीत. त्यामुळे आमच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात तथ्य नाही. उलट, माजी महापौरांना मनपाच्या निवडणुकीत साधे उभेही राहता आले नाही, बाबू चोरडिया कोणामुळे व कशामुळे लाचलुचपतला पकडला गेला, कोणाच्या मोबाईलचे बिल भरायचे होते, याची उत्तरे माजी महापौरांनी द्यावीत तसेच रस्ता पाहणीच्यावेळी शिवसेनेच्या माजी आमदारासमवेत शिवसेनेचा एकही नगरसेवक का नव्हता, याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हान या नगरसेवकांनी दिले. कोणाच्या नावाखाली कोणी कोणाला ब्लॅकमेल करून गल्ला भरू नये व राजकीय पोळी भाजू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. रस्त्याचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराने, मला तोंड उघडायला लावू नका, असे केलेले वक्तव्य कोणाबाबत होते, याचाही खुलासा विरोधकांनी करावा, असेही नगरसेवकांनी स्पष्ट केले.
Post a Comment