रोटरीने सुरू केले मोफत कोवीड सेंटर; पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मनपाच्या मदतीने केली सुविधा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
रोटरी क्लब मिडटाउन, रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल, रोटरी क्लब अहमदनगर मेन, रोटरी क्लब अहमदनगर प्रियदर्शनी व रोटरी क्लब अहमदनगर इंटिग्रिटी या पाच क्लबने एकत्र येऊन मोफत कोवीड सेंटर नगरला सुरू केले आहे. बुरुडगाव रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेजमधील विद्यार्थी होस्टेलमध्ये १२० खाटांचे हे कोवीड सेंटर सुरू केले गेले आहे. महापालिकेच्या मदतीने सुरू झालेल्या या सेंटरमध्ये मनपाचे डॉ. सतीश राजूरकर रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन करणार आहेत.

या रुग्णांना राहण्यासाठीची आधुनिक व्यवस्था तसेच दैनंदिन गरजेचे साहित्य व दोनवेळचे जेवण रोटरीद्वारे दिले जाणार आहे. वैद्यकीय उपचार, आरोग्य मार्गदर्शन, योगासने व प्राणायाम मार्गदर्शन तसेच मनोरंजन सुविधा या केंद्रात करण्यात आली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या कोवीड सेंटरला भेट देऊन येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. या केंद्रातील भोजन सेवेला महापौर वाकळे यांनी वैयक्तिक ५१ हजाराची मदत लगेच जाहीरही केली तसेच महापालिकेद्वारेही अन्य आवश्यक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

या मोफत कोवीड सेंटरमध्ये कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्रवेश दिला जाणार आहे. गुरुवारी रोटरीचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उदघाटन झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, डॉ. अनिल आठरे, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य सातारकर तसेच पाचही क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यात क्षीतिज झावरे, दिगंबर रोकडे, प्रसन्ना खासगीवाले, ईश्वर बोरा, अॅड. अमित बोरकर, पुरुषोत्तम जाधव, गीता गिल्डा व देविका रेले, रफिक मुन्शी व सुयोग झंवर तसेच शिरीष रायते,  प्रमोद पारिख, योगीता मुथा, भाविका चंदे आदी उपस्थित होते. या केंद्रासाठी जैन ओसवाल युवक संघ, इनरव्हील क्लब, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान यांनीही सहकार्य केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post