प्रत्येक मंदिराला ३ लाख रुपये द्या; हिंदू जनजागृती समितीची मागणी


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
आर्थिक संकटात सापडलेल्या गाव-खेड्यांतील प्रत्येक मंदिरांना शासनाने तातडीने आर्थिक साहाय्य देण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. मंदिरांतील प्रत्येक सेवेकर्‍याला १ एप्रिल २०२०पासून कोरोनाची अधिसूचना केंद्र शासनाकडून मागे घेतली जाईपर्यंत दरमहा १० ते १५ हजार वेतन द्यावे व  मंदिरांच्या देखभालीसाठी प्रत्येक मंदिरास एकरकमी ३ लाख रुपये द्यावेत, अशी मागणीही समितीने केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू झाल्यानंतर मागील ४ महिने राज्यातील मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्‍या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणणे हिंदू जनजागृती समितीचे आहे. मंदिरांच्या नित्य पूजेचा आणि देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज जाहीर करावे आणि मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्‍या समाजाला थेट आर्थिक मदत करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत समितीच्यावतीने मुख्य सचिव तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नुकतीच अशा प्रकारची मागणी शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात घनवट यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील काही देवस्थानांना चांगले उत्पन्न मिळते आणि त्यांच्याकडे संचित संपत्तीही आहे; मात्र गावे आणि खेड्यांतील मंदिरांवर मात्र फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. देवभक्ती आणि श्रद्धा हा सर्वसामान्यांचा आधार आहे. हा आधार तुटू देता कामा नये. त्यासाठी मंदिरांचे अस्तित्व टिकवावेच लागेल. यासाठी हिंदु जनजागृती समितीने शासनाला विनंतीवजा सूचना केल्या आहेत आणि धर्मादाय आयुक्त वा या धार्मिक संस्थांचे शासननियुक्त प्रशासक इत्यादींना शासनाने तसे आदेश तातडीने द्यावेत, अशी मागणी केली आहे. ग्रामपंचायत अथवा महसूल विभागात अथवा धर्मादाय आयुक्तांकडे हिंदु मंदिर म्हणून नोंद आहे आणि वार्षिक उत्पन्न 30 लाखाहून जास्त नाही, अशा मंदिरांची सूची तातडीने तयार करावी व या मंदिरांना ३ लाखाची मदत करावी तसेच येथील सेवेकऱ्यांना १० ते १५ हजाराचे मासिक वेतन सुरू करावे,  हे आर्थिक साहाय्य देण्यात काही अडचणी जाणवत असतील, तर श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री साई संस्थान, श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर, श्री काळाराम मंदिर आदी मंदिरांनी तसेच लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळासारख्या धार्मिक संस्थांनी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना शासनाने मंदिर समित्यांना करावी. तसेच सधन मंदिरांनी देवपूजा व मंदिराची डागडुजी यांच्याशी संबंधित खर्च वगळता अन्य कोणतेही खर्च करू नयेत, असेही समितीने सुचवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post