सरकार बदलल्याने मेंढपाळांवर अन्याय : सरसेनापती शेवाळे यांचा दावा

 
एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : राज्यातील सरकार बदलल्याने मेंढपाळ यांच्यावर अन्याय होत आहे, वन जमिनीत मेंढ्या चारण्यास मुभा असताना त्यांना मनाई केली जात आहे, त्यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत व ते दिले नाही तर त्यांना मारहाण करून त्यांच्याविरुद्धच गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे यांनी केला आहे.
 
संगमनेर तालुक्यातील धनगरवाडी तळेगाव येथे 9 जुलै ला वन जमिनीत मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळ लोकांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ व मारहाण झाली आहे तसेच या मेंढपाळ विरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे, त्यांची भेट सरसेनापती शेवाळे यांनी घेतली, त्यानंतर त्यांनी भूमिका मांडली.  यावेळी जिल्ह्या प्रमुख प्रदीपराज भोंडे, उपजिल्हाप्रमुख रेवणनाथ शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सोपान कांदळकर, सचिव बाळासाहेब घोडे तसेच मेंढपाळ भामाबाई घोडे व अन्य उपस्थित होते.
 
वन जमिनीच्या राखीव क्षेत्रातील काही भाग गुरेढोरे व मेंढ्या चरण्यासाठी राखीव असतो, मागील भाजप सरकारच्या काळात बुलढाणा व जळगाव जिल्ह्यात 2 वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर मेंढ्या चरण्यासाठी अशी मुभा दिली गेली, पण नन्तर महाराष्ट्र बाहेरच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी निगेटिव्ह अहवाल दिल्याने ही योजना बंद पडली, त्यानंतर बदललेल्या सरकारच्या आताच्या काळात वन जमिनीत मेंढ्या चारण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी पैसे मागतात, यावरून राज्यात 2 ठिकाणी संघटनेने लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रारी केल्या व दोघांना पकडून दिले, तरी पैसे मागण्याचे प्रकार थांबलेले नाहीत, असा दावा शेवाळे यानी केला.
 
धनगरवाडी तळेगाव येथील मेंढपाळ याना 25 हजार रुपये मागितले होते, मागील वर्षी लाळ्या खुरकूत रोगाने अनेक मेंढ्या दगावल्या असल्याने आता अडचण आहे, एक-दोन महिन्यांत पैसे देण्याचे सांगितले होते, पण तरीही मेंढपाळ याना मारहाण झाली, गलिच्छ शिवीगाळ झाली व नंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्धच दाखल झाला आहे, हा अन्याय असून 8 दिवसात हा गुन्हा मागे घेतला जावा, भामाबाई घोडे व अन्य मेंढपाळ यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी, वन क्षेत्राच्या खुल्या भागात मेंढी चराईस प्रतिबंध करू नये, पैशासाठी मेंढपाळ यांची पिळवणूक होऊ नये या मागण्याची दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. वन विभाग मेंढपाळ याना गुन्हेगार बनवण्याचे पाप करीत आहे, असा दावा ही त्यांनी केला.

भाजपवर टीका
भाजप सरकारने जसे दिलदार पणे मराठा समाजास आरक्षण दिले, तसा दिलदार पणा त्यांनी धनगर समाजास आरक्षण देण्यात दाखवला नाही, अशी टीका शेवाळे यांनी केली. भाजप सरकार सुरुवातीची 3 वर्षे धनगर आरक्षण साठी अनुकूल होते, पण शेवटची 2 वर्षे त्यांनी हा विषय गुंडाळून ठेवला, असा दावा शेवाळे यांनी केला. धनगर समाजाच्या नेत्यांनी आरक्षण विषयाचा राजकीय वापर केला, मेंढ्या चराईसारख्या मूळ विष्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले, असा दावाही शेवाळे यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post