तत्कालीन महापौरांचा लाखाचा पोल अन् 50 लाखांचा झोल : संपत बारस्कर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्या प्रभागातील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, टी.व्ही. सेंटर ते झोपडी कॅन्टीनपर्यंत अद्ययावत पथदिवे उभारणीच्या 50 पोलच्या कामासाठी सुमारे 50 लाख रुपयांची निविदा काढून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला. प्रत्यक्षात प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौकापर्यंत ४८ पोल उपलब्ध आहे. यामध्येही दोन पोल गहाळ आहेत. काही पोलवर दिवेसुद्धा नाहीत.
बसविल्यापासून एकदाही लाईट लागले नाही. या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरुन हा प्रकार नगरकरांच्या पुढे आला आहे. एक पोलची किंमत सुमारे ९३ हजार आहे. झोपडी कॅन्टीन, मकासरे हेल्थ क्लब, टी.व्ही. सेंटर या
ठिकाणी तर पोलच बसविण्यात आले नाहीत. तत्कालीन महापौर बाबुंनी लाखाचा पोल लावुन नुसता झोलच झोल केला असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी केला आहे. या कामाची त्रयस्त चौकशी समिती मार्फत चौकशी करावी व लवकरात लवकर अहवाल सादर करावा. संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही बारस्कर यांनी केली आहे.

बारस्कर यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पोल खोल केली. यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक अविनाश घुले, निखील वारे, डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्रिंबके, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, बाबासाहेब गाडळकर, विद्युत विभागाचे प्रमुख आर. जी. मेहेत्रे व अमित खामकर उपस्थित होते.

विनीत पाऊलबुद्धे म्हणाले की, नगर शहरातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी अशा प्रकारे होत असेल तर, संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. प्रत्येक कामाची गुणवत्ता तपासली पाहिजे. एक लाखाच्या पोलवर जर दिवेच बसविले नसतील तर प्रकाश कुठून पडणार? 50 लाख रुपयांच्या कामाचा उपयोग झाला कोणासाठी? असा प्रश्न उभा राहतो. लवकरात लवकर या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे ते म्हणाले.

निखिल वारे म्हणाले की, बीआरजीएफमधून 50 लाख रुपयांची निविदा काढून अर्धवट पोल बसविण्याचे काम केले. या पोलवर दिवेसुद्धा बसविले नाही, तसेच झोपडी कॅन्टीन, मकासरे हेल्थ क्लब व टी.व्ही.सेंटर दरम्यान एकही पोल अस्तित्वात नाही. या निविदा प्रक्रिया मंजुरीसाठी महासभा व स्थायी समितीमध्ये किती तारखेला मंजुरी मिळाली, याची माहिती देण्यात यावी. 

विद्युत विभाग प्रमुख मेहेत्रे म्हणाले की, लवकरात लवकर त्रयस्त समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व सत्य परिस्थितीचा अहवाल तयार करुन आयुक्तांसमोर ठेवले जाईल. त्रुटी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post