आता उड्डाणपुल कामगारांना मारहाण होणार नाही; खा. डॉ. विखेंनी दिली ग्वाही


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
उड्डाणपुलाचे काम करण्यास आलेल्या कामगारांना मारहाण करण्याचा प्रकार पूर्वी घडले असले तरी आता असे अजिबात होणार नाही, उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कोणत्याही कामगाराला मारहाण होणार नाही, असा दावा नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे गुरुवारी केला. आम्ही दोघे (खा. विखे व शहराचे आमदार संग्राम जगताप) पुलाच्या विषयावर एकत्र असल्याने पुलाच्या कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दोघेच त्यांना पिटाळून लावू, अशी टिपणीही खा. विखेंनी केली. दरम्यान, उड्डाण पुलाच्या कामास संरक्षण विभागाने ना-हरकत दिली असल्याने व पुलाचे काम घेतलेल्या ठेकेदारासही लेटर ऑफ अॅवॉर्ड (वर्क ऑर्डर) दिले गेले असल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुलाच्या फाउंडेशनसाठी (पाया) जमीन सर्वेक्षण होईल व शेवटच्या आठवड्यात सिमेंट, गज व अन्य साहित्य येऊन प्रत्यक्ष पुलाच्या कामास सुरूवात होईल. पुलाचे काम आता कोणीही थांबवू शकणार नाही, असेही खा. डॉ. विखे यांनी आवर्जून सांगितले.

नगरच्या सक्कर चौकापासून जीपीओ चौकापर्यंतच्या ३ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी संरक्षण विभागाची जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यास संरक्षण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या पुलाचे काम करण्याचा ठेका घेतलेल्या अहमदाबाद (गुजराथ) य़ेथील दिनेशचंद्र अग्रवाल या ठेकेदारास केंद्र सरकारने लेटर ऑफ अॅवॉर्ड दिले आहे. त्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे. उपमहापौर मालनताई ढोणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नगर कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल दिवाण आदींसह अन्य यावेळी उपस्थित होते. शिरूर-नगर रस्ता चौपदरीकरणात नगरच्या स्टेशन रस्त्यावर प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलाच्या कामासाठी सुमारे १२-१५ वर्षापूर्वी जमिनीखालील मुरुम, खडक व अन्य तपासणी करण्याचे काम करणाऱ्या कामगारांना बेदम मारहाणीची घटना घडली होती. त्यानंतर पुलाचे काम बंद पडले ते आजतागायत होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर नव्याने पुलाचे काम सुरू होत असल्याने पूर्वीसारखी कामगारांना मारहाण झाली तर काय करणार, असे खा. डॉ. विखे यांना विचारले असता, पुलाच्या कामास मदत केल्याचे श्रेय शहराच्या आमदारांनाही मी देत असल्याने तसे प्रकार आता काही होणार नाहीत. शिवाय भूसंपादनातही कोणाचा अडथळा येणार नाही कारण भूसंपादनातील अनुभवी महापौर आमच्या समवेत आहेत, अशी मिश्किल टिपणीही डॉ. विखेंनी केली.

उड्डाणपुलाबाबत खा. डॉ. विखे म्हणाले...
  • सक्कर चौक ते जीपीओ चौक ३ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी २५८ कोटी ३० लाखाची निविदा मंजूर आहे. ठेकेदाराकडून १२ कोटी ९१ लाखाची अनामत रक्कम जमा झाली आहे. एकूण १०.३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी ८.८८ हेक्टर सार्वजनिक बांधकाम विभागाची असून, ती १०० टक्के संपादित झाली आहे. संरक्षण विभागाची ०.६४ हेक्टर जमीन असून, त्यासाठी ३ कोटी ४४ लाख व भिंगार कॅन्टोन्मेंटला ६० लाख असे दोन्ही मिळून ४ कोटीची रक्कम शुक्रवारी (१८ जुलै) महापालिकेकडून संरक्षण विभागाच्या खात्यात जमा केली जाणार आहे. खासगी जमीन ०.४७ हेक्टर असून, त्याच्या जमीन मालकांपैकी १२जणांनी संमती दिली आहे. ३४जण राहिले असून, त्यांचे पैसे कोर्टात भरले जाणार असून, त्यांच्या मालमत्तेच्या सात-बारावर शासकीय प्रयोजनासाठी नमूद करून ताबा घेतला जाणार आहे. भूसंपादनासाठी राज्य सरकारने १७ कोटी ८४ लाख रुपये दिले असून, त्यापैकी ६ कोटी खर्च झाले आहेत, ११ कोटी शिल्लक आहेत व त्यातून ४ कोटी रुपये संरक्षण विभागाला दिले जाणार आहेत.
  • ठेकेदारास लेटर ऑफ अॅवॉर्ड दिले गेल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुलाचे फाउंडेशन करण्यासाठी जमिनीचे अंतर्गत सर्वेक्षण त्यांच्याकडून सुरू होईल व शेवटच्या आठवड्यात सिमेंट पिलर व अन्य कामांसाठी सिमेंट, स्टील व अन्य बांधकाम साहित्य येण्यास सुरुवात होऊन प्रत्यक्ष कामही तेव्हाच सुरू होईल. आता नव्याने कोणतेही भूमिपूजन होणार नाही. थेट दोन-अडीच वर्षाने पुलाचे उदघाटनच केले जाईल. या पुलासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, नगरचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महामार्ग विकास प्राधिकरणाचे दिवाण, नगरचे प्रांताधिकारी अशा सर्वांची मदत झाल्याने त्यांचे आभार मानतो.
  • पुलाचे काम होण्याआधी स्टेशन रस्त्याखाली असलेल्या पिण्य़ाच्या पाइपलाइन, टेलिफोन वाहिन्या, वीज वाहिन्या व अन्य युटिलिटी शिफ्टींगसाठी मागील भाजप सरकारने ५४ कोटीचा खर्च मंजूर केला होता. त्यापैकी १७ कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत, राहिलेले पैसे राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून आणण्यासाठी आ. जगताप यांच्यासह अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण भेटू, असेही खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post