..तर, नगरमध्ये कोरोनाचे तांडव होईल; खा. सुजय विखेंनी व्यक्त केली भीती

 
श्रीराम जोशी 
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगरमध्ये रोज १०० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत असून, सिव्हील हॉस्पिटलमध्ये तब्बल १ हजारजणांच्या कोरोना टेस्टिंग प्रलंबित आहेत. नगर शहरात रुग्ण वाढीचा वेग येत्या काही दिवसातच रोजचा दीडशे ते दोनशे पॉझिटीव्ह होऊ शकतो. त्यामुळे पुढचे ५ दिवस शहरात कडक कर्फ्यू झाला नाही तर शहरात कोरोनाचे तांडव होईल, अशी भीती नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. शहरात असे काही झाले तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर राहील, शहरात पुढे वाढणाऱ्या केसेस व होणाऱ्या मृत्यूस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

विळद घाटातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे फाउंडेशन हॉस्पिटल व मनपामध्ये करार झाला असून, त्याची माहिती डॉ. विखे यांनी दिली. ते म्हणाले, मनपाद्वारे संकलित केलेल्या कोरोना स्वाबची तपासणी विखे हॉस्पिटलमध्ये होणार आहे व यासाठी मनपाचे स्वाब संकलन केंद्र पेमराज सारडा महाविद्यालयात राहणार आहे. या स्वाबचा तपासणी अहवाल कमीतकमी ८ ते जास्तीतजास्त २४ तासात डॉ. विखे हॉस्पिटल देणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बुथ हॉस्पिटल व सिव्हील हॉस्पिटल फुल्ल झाले आहे. शहरात रोज १०० व ग्रामीण भागात रोज १०० असा सध्याचा रुग्ण वाढीचा असलेला वेग येत्या काही दिवसातच आणखी वाढणार आहे. त्यामुळे ५ दिवसाचा कडक कर्फ्यू शहरात लावून कोणालाही घराबाहेर पडू देऊ नये तसेच दुसरीकडे या काळात सिव्हील व बुथमधील उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना घरी पाठवून त्यांच्यावर त्यांच्या घरीच पुढील उपचार केले जावेत व पाच दिवसानंतर पुन्हा नव्या रुग्णांना बुथ व सिव्हीलमध्ये उपचार सुरू केले जावेत, असेही डॉ. विखेंनी सुचवले. मनपा व विखे हॉस्पिटलमध्ये झालेल्या कराराप्रमाणे राज्य सरकारनेही खासगी लॅबची तपासणीसाठी मदत घ्यावी, त्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन विभागातून आर्थिक तरतूद करावी,असेही त्यांनी सुचवले. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या असल्या तरी राज्यांना त्यांच्या राज्यातील स्थितीनुसार आवश्यक बदल करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे शहरात पाच दिवसांचा कर्फ्यू निर्णय अधिकार जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचा आहे, असेही त्यांनी सांगितले. विखे हॉस्पिटलमध्ये मागील ३ दिवसात ४२९ जणांची तपासणी झाली व त्यात १३७जण पॉझिटीव्ह आले आहेत. आमच्याकडील पॉझिटीव्ह रिपोर्टस सिव्हीलला पाठवले जात असून, त्यांच्याकडून संबंधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणाबाबत प्रक्रिया होत आहे, असे सांगून ते म्हणाले, कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. वेळीच उपचार घेतले तर जीवाला धोका नाही. विखे रुग्णालयात डॉक्टरांनी रेफर केलेल्या व्यक्तीची स्वाब तपासणी होते तसेच कोणाला स्वतःहून अशी तपासणी करावयाची असल्यास शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार ती केली जाते, असेही त्यांनी सांगितले. खासदार निधीतून सिव्हील हॉस्पिटलला १२ अॅम्बुलन्स आपण देणार असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

आ. जगतापांची सावध भूमिका
खा. डॉ. सुजय विखे यांनी नगर शहरात ५ दिवसांचा कडक कर्फ्यू लावण्याची मागणी केली असली तरी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे. शहरातील सध्याची रुग्ण स्थिती तसेच वाढीचा वेग व आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाकडून तसा अहवाल आला तर त्यावर आपण बोलू. आपल्याकडे याआधीही लॉकडाऊन होऊन गेले आहे. ३ महिने आपण त्याला सामोरे गेलो आहोत. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा तसा अहवाल व प्रस्ताव आला तरच त्यावर बोलता येइल, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post