एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहराबाहेरून जाणाऱ्या बासपासमध्ये (बाह्य वळण रस्ता) पाथर्डी रोड (चांदबिबी महाल) ते औरंगाबाद रस्ता (शेंडी) हा पट्टा येणार नाही, असे स्पष्टीकरण नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे.
औरंगाबाद रस्ता ते पाथर्डी रस्ता या दरम्यान सर्व संरक्षण विभागाची जमीन आहे व बाह्यवळण रस्त्यासाठी या जमिनीचे संपादन होऊच शकणार नाही. त्यामुळे मनमाड रस्त्यावरील विळद घाटापासून सुरू होणारा बायपास कल्याण रस्ता चौक-पुणे रस्ता चौक-अरणगावजवळ सोलापूर रस्ता चौक मार्गे पाथर्डी रस्ता असा ४० किलोमीटरचाच होणार आहे व या कामात कोठेही भुयारी रस्ता होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ९६२ कोटीचा खर्च या चार पदरी बायपाससाठी होणार आहे. ३०० कोटी रुपये भूसंपादनासाठी व राहिलेले पैसे या चार पदरी रस्त्याच्या सिव्हील वर्कसाठी खर्च होणार आहेत. भूसंपादनासाठी १०० कोटी रुपये आले आहेत. या बायपासमध्ये ८० गुंठे जमीन संरक्षण विभागाची असून, ती संपादित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, असेही डॉ. विखे यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या निधीतून महापालिकेद्वारे अमृत पाणी योजना, भूमिगत गटार योजना, उद्याने व अन्य कामे होत असून, येत्या १ वर्षात ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. महिनाभरापूर्वी महापालिकेत या कामांसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर या सर्व कामांमध्ये २५ टक्के प्रगती झाली आहे. लवकरच दुसरी आढावा बैठक घेऊन या कामांची सद्यस्थिती नगरकरांसमोर मांडू, असेही त्यांनी सांगितले.
Post a Comment