.. तर, महापालिकेला द्यावी लागेल नुकसान भरपाई


श्रीराम जोशी 
एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : बुरुडगावच्या कचरा डेपोमुळे होत असलेल्या पर्यावरण हानीचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मागवला आहे. या अहवालानुसार बुरुडगाव कचरा डेपोमुळे त्या परिसरातील पर्यावरणाची हानी झाल्याचे स्पष्ट झाले तर त्या परिसरातील रहिवाशांना नुकसान भरपाई देण्याची वेळ महापालिकेवर येऊ शकते. अर्थात, प्रदूषण नियंत्रण मंडळाला पर्यावरण हानीबाबत अहवाल देण्याची मुदत हरित लवादाने २ सप्टेंबरपर्यंत दिली आहे व त्या अहवालावर लवाद निर्णय़ घेणार आहे. पण तोपर्यंत बुरुडगाव कचरा डेपोतील प्रस्तावित विकास कामे पूर्ण करण्याचे आव्हान मनपासमोर असणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त असलेल्या महापालिकेला आता बुरुडगाव कचरा डेपोतील प्रलंबित विकास कामांकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

बुरुडगाव कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील रहिवासी राधाकिसन कुलट यांनी राष्ट्रीय हरित लवादात तक्रार केली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी झाली. मनपाकडून त्यांचा वकील वा प्रतिनिधी कोणीही हजर नव्हते. फक्त ५ कोटीची बँक गॅरंटी मनपाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिली असल्याचे या सुनावणीत स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर लवादाने बुरुडगाव डेपो परिसरातील पर्यावरण हानीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने २ सप्टेंबरपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले. या अहवालानंतर संबंधित नुकसान झालेल्यांना भरपाई द्यायची की नाही, हे स्पष्ट केले जाइल, असे लवादाने स्पष्ट केल्याचे तक्रारदार राधाकिसन कुलट यांनी सांगितले. लवादाच्या आदेशाने मनपाने काही विकास कामे या डेपोत सुरू केली आहेत. कचऱ्यातून खत निर्मिती करणारा प्रकल्प, जुना कचरा हटवून जागा मोकळी करण्याचे बायोमायनिंगचे काम, हॉटेलांतील व्हेज-नॉनव्हेज वेस्ट मटेरियलवर प्रक्रिया करणारा बायोमिथेनेशन प्रकल्प, बेवारस जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठीची विद्युतदाहिनी आदी कामे ५० ते ६० टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादासमोर मांडल्याचे तक्रारदार कुलट यांनी सांगितले. दरम्यान, बायोमिथेनेशन व कचऱ्यातून खत निर्मितीचे प्रकल्प मनपाने पूर्ण केल्याचे सांगितले जाते, पण लवादासमोरील सुनावणीस मनपा प्रतिनिधी वा मनपाचा वकील उपस्थित राहिला नसल्याने ही माहिती लवादासमोर देता आली नसल्याचेही मनपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post