श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : भारतात
२०६१मध्ये हिंदू अल्पसंख्य होणार असल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीचे
राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे व राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे
यांनी केला आहे. यंदाच्या नवव्या हिंदू राष्ट्र अधिवेशनात याच विषयावर
प्राधान्याने चर्चा होणार असून, ३५ तज्ज्ञ व देशविदेशातील पाचशेवर विविध
हिंदू संघटना प्रतिनिधी यावर विचारमंथन करणार आहेत, असेही त्यांनी
सांगितले. २०२३ पासून देशात हिंदू राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया गतिमान
होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.नवव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी शिंदे व पिंगळे यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्त चेतन राजहंस यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यात देशभरातील माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार २०६१ मध्ये भारतात हिंदू अल्पसंख्य होतील, अशी स्थिती आहे व या सर्व पार्श्वभूमीवर हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्क मिळण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, या प्रमुख मागणीसाठी नववे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे अधिवेशन ३० जुलै ते २ ऑगस्ट आणि ६ ते ९ ऑगस्ट २०२० या कालावधीत रोज सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ या वेळेत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हे अधिवेशन सर्वांसाठी खुले असून हिंदू जनजागृती समितीचे युट्युब चॅनेल, फेसबुक पेज व ट्विटरवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. देशात हिंदू राष्ट्र स्थापन व्हावे, मूळ राज्य घटनेत नसलेला व १९७६मध्ये त्यात समाविष्ट केलेला 'सेक्युलर' हा शब्द वगळून त्या जागी 'हिंदू राष्ट्र' शब्द टाकला जावा, जगभरातील हिंदू समाजाचे रक्षण करावे, गोहत्या प्रतिबंध कायदा करावा, मंदिरांचे सरकारीकरण बंद केले जावे, प्राथमिक शिक्षणापासून अभ्यासक्रमात देशभक्ती व धर्मशिक्षण दिले जावे, अशा विविध विषयांवर या अधिवेशनात तज्ज्ञांद्वारे चर्चा होऊन तसे ठराव केले जाणार असल्याचे समितीद्वारे सांगण्यात आले.
५ ऑगस्टला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनापासून देशाची वाटचाल हिंदू राष्ट्र होण्याच्या दिशेने सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. नागरिकत्व कायदा सुधारणा तसेच काश्मीरमधील ३७०वे कलम हटवण्यासारखे निर्णय हिंदू राष्ट्र संकल्पनेला गती देणारे असल्याचा दावाही करण्यात आला. हिंदू राष्ट्र अधिवेशनात सहभागी सर्व हिंदुत्ववादी संघटनांना अधिवेशनानंतर समान कृती कार्यक्रम दिला जाणार असून, त्याद्वारे हिंदू राष्ट्र का गरजेचे आहे, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
Post a Comment