पंढरपुरातील 'त्या' प्रकारावर हिंदू जनजागृती समितीचा आक्षेप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
पंढरपुरात विठूरायासमोर अधिकाऱ्याला घातले गेलेले स्नान (आंघोळ) वादात सापडण्याची चिन्हे आहेत. हिंदू जनजागृती समितीने या प्रकाराला आक्षेप घेताना यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट व पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक मनोज खाडये यांनी हे आक्षेप घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

यासंदर्भात घनवट व खाडये यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीविठ्ठलाच्या मूर्तीवर ९ जुलैला प्रक्षाळ पूजेचा धार्मिक विधी चालू होता. तेव्हा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीच्या एका अधिकार्‍यास गाभार्‍यातच स्नान घातल्याचा संतापजनक प्रकार घडला. त्याही पुढे जाऊन स्नान घातलेल्या अधिकार्‍यांनी. आमचीच प्रक्षाळ पूजा केली की ? असा प्रश्‍न केल्यावर उपस्थित पुजार्‍यांनीही, हे असेच असते, असे उत्तर दिल्याचे व्हिडिओतून दिसले. हे अत्यंत निषेधार्ह असून या प्रकाराविषयी विठ्ठलभक्त, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सरकारीकरण झाले असले तरी सरकारी अधिकार्‍यांनी मंदिरे ही सरकारी कार्यालये नाहीत, याची जाणीव ठेवावी. मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर प्रशासनाकडून सातत्याने असे गैरप्रकार होत आहेत. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

श्रीविठ्ठलाच्या गाभार्‍यातच सेक्युलर प्रशासनाच्या अधिकार्‍याला देवासोबत स्नान घालून त्यांना देव बनवण्याचे काम पुजार्‍यांनी करू नये. कोरोना काळातील जमावबंदीच्या नियमाकडे बोट दाखवून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरून आलेल्या पालखीला पंढरपूरच्या मंदिरात न सोडणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांनी मंदिरातील धार्मिक नियमांचे पालन का करू नये ? त्यामुळे या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे, असेही समितीने कळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post