गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बदल करा; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधी यांना पत्र


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला वर्ष झालं असून, काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.

सत्तातून पायउतार झाल्याच्या सहा वर्षानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मागील वर्षभरापासून पूर्णवेळ नेतृत्वाशिवाय असलेल्या काँग्रेसमध्ये आता अध्यक्षांच्या निवडीची मागणी होऊ लागली आहे. पक्षामध्ये अमूलाग्र बदल करण्याविषयी काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. भाजपा राजकीय आघाडीवर पुढे असून, निर्णायक असलेल्या देशातील तरुण मतदारांनी नरेंद्र मोदी यांना मतदान केलं असल्याचा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी नमूद केला आहे. तरुणांचा काँग्रेसवरून विश्वास कमी होणं ही चिंतेची बाब असल्याचंही म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारं हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आलं आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचं विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या होत असलेल्या घसरणीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षांनं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं नाही,” असं या नेत्यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post