राज्यात २४ तासांमध्ये ३०० पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने वाढतच आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे यासाठी या महामारीत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ३०३ पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १२ हजार २९० झाली आहे. या मध्ये पूर्णपणे बरे झालेले ९ हजार ८५० जण, सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३१५ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १२ हजार २९० करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार २७७ अधिकारी व ११ हजार १३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ३१५ पोलिसांमध्ये २८६ अधिकारी व २ हजार २९ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या ९ हजार ८५० पोलिसांमध्ये ९८० अधिकारी व ८ हजार ८७० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १२५ पोलिसांमध्ये ११ अधिकारी व ११४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post