अनिलभैय्या राठोड : सामान्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा शिवसेनेचा वाघ


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांच्या गारुडामुळे आपले संपूर्ण आयुष्य समाजकारणासाठी अर्पण करणारे अनेक नेते, कार्यकर्ते शिवसेनेने घडवले. 80 टक्के समाजकारण व फक्त 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद तंतोतंंत अंमलात आणणारा नेता म्हणून शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे नाव नक्कीच घ्यावे लागेल. फक्त लिहिण्या वाचण्यापुरते नाही तर खरोखर लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणे म्हणजे काय असते, याची प्रचिती अनिलभैय्यांच्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक वाटचालीतून येते. दुर्दैवाने आज ते आपल्या सर्वांना कायमचा जय महाराष्ट्र करून निघून गेले. परंतु, ते हयात नाहीत, यावर अजूनही विश्वास वाटत नाही. वाटतं अचानक मोबाईल वाजेल व पलिकडून आवाज येईल, ‘काय चाललंय दत्ताभाऊ?, आपल्याला एका कार्यक्रमाला जायचंय, तयार रहा’. तब्बल अडीच दशके आमदारकी भूषवूनही निगर्वी राहिलेले व सर्वांना कायम सोबत घेवून चालणारे अनिलभैय्या म्हणजे नगरसाठी, शिवसेनेसाठी, शिवसैनिकांसाठी अनमोल मार्गदर्शक होते.

आमच्या जाधव परिवाराचा राजकारणातील प्रवेश जरा उशिराच झाला. त्याआधी आमच्या कुटुंबाला समाजकारणाची परंपरा होती. राजकारणाशी तसा थेट संबंध नसला तरी नगरच्या राजकारणात अनिलभैय्या यांच्या नावाभोवती असलेले वलय याचे आकर्षण होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रत्यक्ष कधी भेटता आले नाही, परंतु त्यांच्या विचारांवर समाजासाठी कार्य करणारे अनिलभैय्यांना लहानपणापासून पाहत आलो. लोकांसाठी अक्षरश: चोवीस तास ते उपलब्ध असत. त्यामुळेच राजकारणात नव्हतो तेव्हापासून अनिलभैय्यांची जनसंपर्काची ही हातोटी खूप आवडायची. रस्त्यावरील भाजी विक्रेता असो की टपरी चालक अडचणीत आल्यावर त्याला आधार असायचा अनिलभैय्यांचा. नेता सुभाष चौकातील राठोड यांचे शिवालय हे कार्यालय जनतेचे तक्रार निवारण केंद्र होते. गोरगरीबांची अडवणूक करणार्‍यांविरोधात अनिलभैय्यांच्या मनात कमालीची चीड असायची. माझा नगरकर मग तो कोणत्याही पक्षाला, नेत्याला मानणारा असो, त्याला विनाकारण कोणी त्रास देवू नये अशी त्यांची भूमिका असायची. त्यामुळेच विरोधी पक्षाला मानणारेही अनेकवेळा अडचणीत सापडल्यावर दाद मागायला अनिलभैय्यांकडेे यायचे.

आमचा राजकीय श्रीगणेशा मनसेकडून झाला तरी मनातून अनिलभैय्यांकडे ओढा पूर्वीपासून होता. त्यामुळे मागील महानगरपालिका निवडणुकीत आम्ही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अनिलभैय्यांनी नेहमी आपुलकीने वागवत योग्य मानसन्मान दिला. या काळात त्यांंचे काम जवळून अनुभवता आले. नगरकर या नेत्यावर इतके प्रेम का करतात हे पाहता आले. कार्यकर्त्यांप्रती त्यांंच्या मनात कायम हळूवार भावना असायची. कार्यकर्त्यांकडून एखादी चूक घडली तर नेता म्हणून त्याची जबाबदारीही ते घेत व कार्यकर्त्याला बळ देेत. राजकारणात तब्बल 25 वर्षे वर्चस्व गाजवूनही त्यांनी पदाचा, सत्तेचा उपयोग कधी स्वत:च्या उत्त्कर्षासाठी केला नाही. सतत लोकांसाठी कार्यमग्न राहण्याचा त्यांचा स्वभाव समोरच्याला जिंकून घ्यायचा. आमच्या कुटुंबातील बाबासाहेब जाधव, संजय जाधव यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. संजय जाधव भेटल्यावर ‘काय संजूभाऊ कसा चाललाय व्यवसाय?’ अशी आपुलकीची चौकशी ते आवर्जून करायचे. हेमंत जाधव हे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. हॉटेल व्यवसायासंबंधी अडीअडचणी त्यांच्यासमोर ते नेहमी मांडायचे. त्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अनिलभैय्या लगेचच संबंधितांशी संपर्क साधायचे व काम मार्गी लावायचे.

हिंदुत्त्ववाद हा त्यांच्यासाठी श्वास होता. तर सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करीत राहणे हा त्यांचा ध्यास होेता. या ध्यासातूनच ते शेवटपर्यंत वाघासारखे जगले. सर्वसामान्यांसाठी भल्याभल्यांशी संघर्ष केेला. आताच्या करोनाकाळातही नगरकरांना लॉकडाऊनचा त्रास होवू नये यासाठी ते झटत होते. दुर्देवाने करोनाची लागण होवून त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. वाघाचे काळीज असलेला निधड्या छातीचा नेता आपल्यातून कायमचा गेला. जाताना अनेक आठवणींचा ठेवा ठेवून गेला. शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी तमाम नगरकरांच्या हृदयात ते कायम विराजमान राहतील. स्व.अनिलभैय्या राठोड यांना समस्त जाधव परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली!

- दत्ता जाधव
महानगराध्यक्ष
महात्मा फुले समता परिषद
अहमदनगर

Post a Comment

Previous Post Next Post