कोरोनासमवेतच आता जगायचे आहे; पालकमंत्री मुश्रीफांचे पुन्हा स्पष्टीकरण


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर शहरात पुन्हा लॉकडाउन करावे किंवा नाही याबाबत जिल्ह्यातील आमदारांसमवेतच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. आता लॉकडाऊन करण्याचा विषय संपलेला आहे. सर्वांना आता कोरोना सोबत घेऊन जगायचे आहे व काळजी घेऊन पुढे वाटचाल करायची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सूचना व नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही त्यांनी केला.

नगर जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार व संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आता जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत व त्यामुळेही रुग्ण संख्या वाढणार आहे. पण जिल्ह्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन होणार नाही, असेही स्पष्ट करून ते म्हणाले, करोना बधिताचे मृतदेह एकावर एक रचून नेण्याचा प्रकार दुर्दैवी आहे व यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. कमी लक्षण असणाऱ्या रुग्णांचे घरीच विलगीकरण करावे, अशा सूचना दिल्या असल्या तरी जिल्ह्यामध्ये प्रशासनाने मात्र तसे केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण, एखाद्याला उपचार द्यायचे असल्यास त्याला घरी उपचार घेता येईल. मात्र, ते घरी देखील व्यवस्थित उपचार घेतील का, जर ते सर्वत्र फिरत बसले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्न आहे. शिवाय, आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये. त्यामुळे सध्या प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वकियांसह विरोधकांनाही इशारा
महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. आमच्यातील एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही आणि फुटणारदेखील नाही. जर असे काही झाले तर तो पुन्हा निवडून देखील येणार नाही, अशा शब्दात मुश्रीफ यांनी भाजपला तसेच स्वकियांनाही इशारा दिला. भाजपने रामदास आठवले यांना राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना काही ना काही बोलावे लागत आहे, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. भाजपवाले काही म्हणू द्या, मात्र महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. ग्रामपंचायत प्रशासक नेमण्यासंदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने नियुक्त्या करू नका, असे निर्देश दिले आहेत. येत्या काही दिवसांत याची सुनावणी होणार असल्याने त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. डाळिंबाच्या प्रश्नाबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विखेंना लगावला टोला
नगरमध्ये लॉकडॉऊन करण्याची मागणी सातत्याने खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत. पण, पालकमंत्र्यांच्या बैठकीस ते अनुपस्थित होते. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, आजच्या बैठकीला ज्यांनी मागणी केली होती तेच आले नाही. ते आले असते व त्यांनी तशी मागणी केली असती तर त्यावर चर्चा देखील झाली असती, अशा शब्दात त्यांनी विखे यांना टोला लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post