कोविड अडचणीतही जपला अलकाताईंनी मूर्तीकलेचा वसा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
सध्याच्या कोरोनाच्या काळात अनेक अडचणी असल्या तरी वंशपरंपरेने मिळालेला मूर्तीकलेचा वारसा जपताना दरवर्षी गणेश मूर्ती करण्याचा वसा येथील अलकाताई दळवी या गृहिणीने यंदाही जपला आहे. दरवर्षी त्या किमान १०० गणेश मूर्ती हाताने तयार करतात, वडिलांकडून आलेला मूर्तीकलेचा वारसा जपताना तयार केलेल्या गणेश मूर्ती नातेवाईक, पारिवारिक मित्रमंडळी व शेजारीपाजारी देतात व त्याबदल्यात मिळालेली ऐच्छिक देणगी विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून देऊनही टाकतात. त्यांच्या या परंपरेला तब्बल २३ वर्षे झाली आहेत. वयोमानाने शारीरिक व्याधी असल्या तर व यंदा तर कोरोनामुळे गणेश मूर्तींसाठी मातीही पुरेशी उपलब्ध झाली नसली तरी मागील शिल्लक मातीच्या माध्यमातून ८-१० गणपती त्यांनी केलेच. हे गणपती नेण्यासाठी शुक्रवारी त्यांच्या घरी आलेल्या अबालवृद्धांनी 'गणपती बाप्पा मोरया' असा गजर केला आणि धन्य झाल्याचे समाधान अलकाताईंच्या चेहऱ्यावर झळकले.

अलकाताईंचे माहेर कोकणातील राजवाडीचे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी). त्यांचे वडील (स्व.) महादेव लोटलीकर मूर्तीकलेचे अभ्यासक होते. ते हाताने शाडू मातीच्या गणेश मूर्ती करायचे. लहानपणी त्यांच्यासमवेत अलकाताईही गणेश मूर्ती करायला शिकल्या. हा वारसा त्यांनी पुढे विवाहानंतरही जपला. नगरमधील बँक अधिकारी अरविंद दळवी यांच्या कुटुंबात विवाहानंतर आल्यावर घरचा गणपती त्यांनी स्वतःच्या हाताने केला. तो पाहून नातेवाईक व शेजारीपाजारीही हरखून गेले व पुढच्या वर्षीपासून आमचा गणपतीही तुम्हीच करायचा, अशी जबाबदारीही त्यांच्यावर टाकली. कुटुंबानेही प्रोत्साहन दिले व मग दरवर्षी अलकाताई मार्च-एप्रिलमध्ये कोकणात जाऊन तेथील माती आणू लागल्या व ती चाळून एकजीव करून ठेवल्यावर जूनपासून एकट्याच शाडू मातीच्या मूर्ती तयार करू लागल्या. या मूर्ती कोरड्या झाल्यावर स्वतःच्याच हाताने त्यांना रंगवायच्या. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यांनी ही मूर्तीकलेची सेवा जपली. सावेडीच्या पाइपलाइन रस्त्यावरील एकवीरा चौकातील शिवतीर्थ बंगल्यात त्यांचे गणपती दालन या मूर्तींनी दरवर्षी सजते. यंदा कोरोनामुळे या परंपरेत खंड पडण्याची स्थिती होती. मार्चपासून वाहतूक बंद असल्याने माती आणण्यासाठी कोकणात जाता आले नाही. पण हाती घेतलेला वसा खंडित होऊ नये म्हणून मागे आणलेल्या व शिल्लक राहिलेल्या मातीतून त्यांनी यंदा ८-१० मूर्ती बनवल्या. 'दगडूशेठ', 'फुलांवर बसलेला', 'मयुरपंखी' अशा विविधांगी या मूर्ती मनमोहक झाल्या आहेत. निवडक परिवाराच्या गणेशोत्सवात शनिवारी त्या भक्तीभावाने विराजमान होणार आहेत.

वडिलांकडून रक्तात मिळालेला मूर्तीकलेचा वारसा जपताना अलकाताईंना पती निवृत्त बँक अधिकारी अरविंदराव दळवी, मुलगा चित्रपट कथालेखक अॅड. अभिजित दळवी व सून बिल्वा दळवी यांचे प्रोत्साहन व मदत होते. शाडू मातीची प्रत्येक मूर्ती त्या स्वतःच्या हाताने तयार करून रंगवतात. यंदा त्यांनी कमी मूर्ती केल्याने अनेकजण नाराज झाले आहेत, पण कोरोनामुळे येत असलेल्या अडचणी सर्वांनाच माहिती असल्याने 'पुढच्या वर्षी तरी आम्हाला मूर्ती नक्की द्या', अशी प्रेमळ मागणीही अनेकांनी केली. गणेश मूर्तीची कोणतीही किंमत अलकाताई घेत नाहीत, घेणारानेच त्याला योग्य वाटेल ती ऐच्छिक रक्कम मूर्तीजवळ ठेवायची. सर्व मूर्ती गणेशोत्सवात घरोघरी विराजमान झाल्यावर जमलेल्या ऐच्छिक रकमेत स्वतःची आणखी काही भर घालून स्नेहालय, सावली, अनामप्रेम, वनवासी कल्याण आश्रम वा अन्य सामाजिक संस्थांच्या सामाजिक कार्याला त्या देणगी देऊन टाकतात. मूर्तीकलेचा वारसा जपताना हातून गणेश मूर्ती करण्याचा आनंद त्या दरवर्षी घेतात. शिवाय शाडू मातीच्या मूर्ती त्या करीत असल्याने पर्यावरण रक्षणाच्या कामात खारीचा वाटाही त्यांचा असतो. भक्ती व सेवेचा हा वसा रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करतो आहे व अलकाताईंनाही नवा उत्साह दरवर्षी देतो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post