आंदोलन करणाऱ्या गुगळेंची प्रकृती बिघडली; लाहोटींकडून त्यांच्यावर मानसिक संतुलन ढासळल्याचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
माजी खासदार दिलीप गांधी यांचे मेहुणे अमृतलाल गुगळे यांनी गांधी यांचे समर्थक केदार लाहोटी यांच्या दारासमोर दोन दिवसांपासून सुरू केलेले उपोषण आंदोलन टोकाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गुगळे मागील ६० तासांपासून आंदोलन करीत असल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना शुक्रवारी सायंकाळी दवाखान्यात अॅडमिट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्याला हलविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, ज्यांच्याविरुद्ध त्यांनी आंदोलन सुरू केले, त्या केदार लाहोटी यांनी स्वतःवरील आरोप फेटाळताना गुगळे यांचे मानसिक संतुलन ढासळल्याचा दावा केला आहे.

गुगळे मूळचे बार्शीचे असून, माजी खासदार गांधी यांच्याकडे राखी पौर्णिमेला आले असताना गांधी यांचे समर्थक लाहोटी यांनी त्यांना आपल्या घरी नेले व त्यांच्या गळ्यातील ३ लाखाची सोन्याची चेन मित्राला दाखवायची म्हणून नेल्यावर परत दिली नसल्याचे गुगळे यांचे म्हणणे आहे, ती चेन मिळण्यासाठी त्यांनी लाहोटी यांच्या स्टेशन रोड-आगरकर मळा परिसरातील घराच्या समोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी त्यांच्या नगरमधील अन्य नातेवाईकांचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, अमृत गुगळे यांचे आता वय झाले आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे घरगुती कौटुंबिक वाद झाले आहेत. त्याचा राग येथे येऊन व्यक्त करीत माझ्यावर घाणेरडे आरोप केले आहे. त्यांच्या खोट्या आरोपांना मी बळी पडणार नाही, असा खुलासा केदार लाहोटी यांनी केला आहे. मी सर्वसामीन्य कुटुंबातून वर आलेलो असून माझे एमआयडीसी व सुपा येथे युनिट आहेत. बार्शी येथील अमृत गुगळे यांनी माझ्यावर चेन चोरल्याचा आरोप केला आहे. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. जर ही खरी घटना असेल, मी गुन्हा केला असेल तर अमृत गुगळे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा. मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास तयार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी हे सिद्ध होईल, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

त्यावर अमृतलाल गुगळे यांनीही प्रत्युत्तर दिले असून, मी कोठे जायचे (पोलिसात वा अन्यत्र) हा माझा अधिकार आहे, हे ठरवणारा तो (लाहोटी) कोणीही नाही. मी वकील आहे व मला काय करायचे ते समजते, असे सांगून ते म्हणाले, कौटुंबिक वादाचा त्याचा दावाही खोटा आहे. दिलीप गांधी वा माझ्या बार्शीच्या घरी माझे काही वाद नाहीच व जरी असले असते तरी याला (लाहोटी) टार्गेट करण्याचे मला काहीच कारण नव्हते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच तब्येत बिघडत असताना बहीण, मेव्हणे कोणीही आले नसल्याची खंतही त्यांनी पुन्हा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post