भंडारदरा धरणातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन-चार दिवसांपासून धुव्वाधार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणीपातळी वाढली आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या या धरणात सध्या ९.६० टीएमसी पाणी असून, पाऊस सतत सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी राखण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले गेले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नगर पाटबंधारे विभागाने दिला आहे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच स्वतःच्या सुरक्षेसह वीज मोटारी, इंजिन, शेती औजारे व पशुधनाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी ९४२ मीटर झाल्याने व पाणीसाठा ९६०६ दशलक्ष घनमीटर (९.६० टीएमसी) झाल्याने तसेच पावसाची संततधार सुरूच असल्याने प्रवरा नदीपात्रात ८३५ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेले. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणाच्या सांडव्यातूनही पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठची गावे, वस्त्या, वाड्यांतील नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये तसेच पात्रातील वीज मोटारी, इंजिन तसेच शेतीऔजारांसह पशुधनांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post