उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार.. मंदिरं उघडण्यासाठी भाजपाचे आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महाराष्ट्र ही साधूसंतांची पावनभूमी आहे. या पावनभूमीमध्ये अनेक संत जन्माला आले आहेत. त्यांनी धार्मिकतेतून महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर आणली. त्यामुळे नागरिकांचा देवदेवतांवरचा विश्वास रुढ झाला आहे. कोरोना संसर्ग विषाणूमुळे संपूर्ण देश गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये आहे. राज्य सरकारने अनेक व्यवहार सुरळित केले आहे. जनताही आपआपली काळजी घेऊन कामकाज करत आहे. सरकारने महसूल वाढावा, यासाठी सर्व व्यवहार सुरु केले आहे. परंतु महाराष्ट्रातील मंदिरे राज्य सरकारने अजूनपर्यंत उघडली
नाहीत. मंदिरे उघडावी यासाठी भाजपाच्यावतीने “दार उघड उद्धवा, दार उघड” आंदोलन राज्यभर करण्यात आले. सरकारने काही अडचण असल्यास अटी व शर्ती टाकून मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी. कोरोना संकटाच्या काळामध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून हजारो दिंड्यांच्या माध्यमातून लाखो भक्त पंढरपूरला पिढ्यानपिढ्या जात होती. परंतु नागरिकांनी आपल्यावर आलेल्या संकट दूर लोटण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य केले आहे. तरी लवकरात लवकर मंदिरे खुली करावी, असे प्रतिपादन मनपा सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी केले.

भाजपाच्यावतीने राज्यातील मंदिरे उघडावी यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड” हे आंदोलन करण्यात आले. गुलमोहोर रोडवरील स्वामी समर्थ मंदिर, नवलेनगर येथील हनुमान मंदिर व तारकपूर रोडवरील झुलेलाल मंदिर येथे शंखनाथ, महाआरती व निदर्शने केली. यावेळी मल्हार गंधे, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, ऋषिकेश देशमुख, गौरव परदेशी आदी उपस्थित होते.

अमित गटणे म्हणाले की, राज्यभरातील मंदिरे बंद असल्यामुळे अनेकांचे व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. तसेच नागरिकांच्या धार्मिकतेचा विषयही तितकाच महत्वाचा आहे. तरी राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे खुले करावी.

मल्हार गंधे म्हणाले की, राज्य सरकारने महसूलचे सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सरकारला दारु अत्यंत महत्त्वाचा विषय वाटला व त्यांनी तो सुरु केला. परंतु नागरिकांच्या धार्मिकतेचा विषय महत्त्वाचा नाही का? तरी सरकारने मंदिरे सुरु करावी अन्यथा भाजपाच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.

गांधी मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती
गांधी मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप मध्यमंडल अध्यक्ष अजय चितळे, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, उपमहापौर मालनताई ढोणे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, अँड. विवेक नाईक आदी उपस्थित होते.


भाजप मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारी जगभरात आलेली आहे. अनेक देश कित्येक महिने लॉक डाऊन च्या अवस्थेत होते. आपला भारत देश ही त्यातून सुटू शकला नाही. भारतात सुद्धा मार्च महिन्यापासून लॉक डाऊन करण्यात आलेला होता. लॉकडाउनच्या काळापासून मंदिरे बंद अवस्थेत आहेत. शासनाने सर्व प्रकारचा लॉक डाऊन आता उठवलेला आहे. सर्व व्यवहार सुरळीत पद्धतीने आता सुरू झालेले आहेत. महसूल गोळा होणे साठी अगदी दारूचे दुकाने हॉटेल्स ही उघडण्यात आलेले आहेत, परंतु मंदिरे आजही बंद अवस्थेतच आहेत. नागरिकांचा देवदेवतांवरचा विश्वास आजही कायम आहे. धार्मिकता ही मानवी जीवनातील श्रद्धास्थान आहे. तरी राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावी, यासाठी भाजपाच्यावतीने मंदिरे उघडण्यासाठी “दार उघड उद्धवा, दार उघड” हे आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post