खासगी रुग्णालयांकडून 'महात्मा फुले'कडे दुर्लक्ष? जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक लाईव्ह संवादात व्यक्त केली खंत


एएमसी मिरर वेब टीम

अहमदनगर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना आजारावरील उपचारांचा समावेश आहे. पण खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे ही आरोग्य योजना राबवण्यासाठी अजूनही प्रशासनाशी संपर्क साधलेला नाही. प्रत्यक्ष जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच रविवारी फेसबुक लाईव्ह संवादात तशी खंत व्यक्त केली. सध्या ही योजना फक्त सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरू आहे, खासगी रुग्णालयांनी या योजनेसाठी प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या प्रतीक्षेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिसांना पाहून वा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या पाहून कारवाई होण्याच्या भीतीपोटी मास्क वापरण्याची मानसिकता सोडून स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी मास्क वापरणे, बाहेर पडल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे व नियमितपणे हात सॅनिटायझिंग करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

सध्या स्वॅब चाचण्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या वाढणार आहे. मात्र, यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. आपण रुग्णांपर्यंत पोहोचून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जेवढे रुग्ण वाढत आहेत, तेवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आजाराची लक्षणे जाणवल्यास जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. ज्या रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत, मात्र ते बाधित आहेत, त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात न येता अशा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले पाहिजे. जेणेकरून गंभीर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा वापरता येईल. विविध रुग्णालयातील खाटांची उपलब्धतेबाबत बोलताना द्विवेदी यांनी, येत्या २-३ दिवसात स्वतंत्र पोर्टल तयार करून जिल्ह्यातील तालुकानिहाय सर्व हॉस्पिटल्सची माहिती व तेथील उपलब्ध बेडसंख्या त्यामध्ये देणार असल्याचे स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांनी त्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेले शुल्कच आकारावे, असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा फेसबुक संवाद साडेचारशेवर नागरिकांनी लाईव्ह पाहिला व विविध प्रश्न मांडले. त्यापैकी बहुतांश प्रश्नांचे स्पष्टीकरण द्विवेदींकडून दिले गेले.

Post a Comment

Previous Post Next Post