अहमदनगर : काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी किरण काळे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
प्रदेश युवक व विद्यार्थी काँग्रेसचे समन्वयक युवा नेते किरण काळे यांची काँग्रेसच्या नगर शहर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. सध्याचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण व ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांना प्रदेश काँग्रेसवर घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. काळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्षपदासह युवक व विद्यार्थी काँग्रेस समन्वयकाचीही जबाबदारी असणार आहे.

येथील नंदनवन लॉन्समध्ये नगर जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे व सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच ही घोषणा केली. जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक बांधणी नव्याने करण्यात येणार असून जिल्हा काँग्रेस, नगर शहर जिल्हा काँग्रेस व सर्व तालुका काँग्रेस कमिटी, त्यांचे पदाधिकारी कालबद्ध पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेतील पदाधिकारी निवडताना सर्व समाजातील सामाजिक घटकांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले. 

या कार्यक्रमास आ. डॉ. सुधीर तांबे व लहू कानडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, शहर जिल्हा काँग्रेसचे मावळते अध्यक्ष दीप चव्हाण, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, जिल्हा काँग्रेसचे ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे यांच्यासह तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न मांडणारे व शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या काँग्रेसप्रणित किसान सेलची निर्मिती करण्यात येणार असून प्रत्येक तालुका पातळीवर किसान सेलची संघटना कार्यरत करण्यात येईल, असेही थोरातांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post