कोविड रुग्णांना 'महात्मा'चा लाभ नाही? मग, १५५३८८ वर फोन कराएएमसी मिरर वेेेब टीम
अहमदनगर :
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत असणाऱ्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ रुग्णांना देण्यासाठी स्वतंत्र कक्ष असतो व तिथे आरोग्य मित्र नियुक्त केले गेले आहेत. नागरिकांना या कक्षात या योजनेची माहिती दिली जाते. त्यामुळे कोरोना रुग्णांना या योजनेचा लाभ दिला जात नसेल किंवा या अनुषंगाने काही तक्रारी असतील, तर या कक्षातील आरोग्य मित्रांकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 155388 हा टोल फ्री क्रमांकही नागरिकांसाठी उपलब्ध आहे व त्यावरही नागरिक तक्रार नोंदवू शकतात.

कोरोना वाढत असल्याने त्याचे उपचार रुग्णांना खर्चिक होऊ नये म्हणून राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वांना लागू केली आहे. शहर व जिल्ह्यात 39 रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांच्याकडून कोरोना रुग्णांवर या योजनेतून मोफत उपचार होणे आवश्यक आहे. राज्य सरकारचेही तसे आदेश आहेत. मात्र, या योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांकडून रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ दिला जात नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्यावर प्रशासनाने त्याची दखल घेण्यास सुरुवात केली असल्याचे तपासणी समितीच्या अध्यक्षा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितले. ही योजना न राबविणार्‍या रुग्णालयांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वांना लागू असल्याने जी रुग्णालये या योजनेत आहेत, त्यांच्याकडून योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा काही तक्रारी असतील तर आरोग्य मित्र कक्षात अथवा टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील योजना समन्वयक डॉ. वसिम शेख यांनी केले आहे.

कोरोनाच्या २१ बिलांमध्ये त्रुटी-रुग्णालयांना नोटिसा
कोरोना झालेल्या खासगी रुग्णालयांकडून अधिक रकमेची बिले आकारण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तपासणी केलेल्या बिलांपैकी 21 बिलांमध्ये त्रुटी आढळल्याने संबंधित रुग्णालयांना म्हणणे मांडण्याच्या नोटिसा प्रशासनाकडून बजावण्यात आल्या आहेत. तसेच तीन रुग्णालयांकडून 73 हजार 900 रुपयांच्या जादा रकमेची रिकव्हरी नोंदविण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांच्या वैद्यकीय बिलांबाबत तक्रारी असल्याने 1 लाखापेक्षा अधिक रकमेच्या बिलांची तपासणी प्रशासनाने सुरू केली आहे. 29 रुग्णालयांच्या बिलांच्या तपासणीसाठी सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयांकडून विहीत नमुन्यात माहिती मागविली गेली असून, त्यांच्याकडून माहिती येत आहे. 29 खासगी रुग्णालयांमध्ये आजपर्यंत1592 रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यातील 1118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. समितीकडे यापैकी 123 बिले तपासणीसाठी आली व त्यापैकी 29 बिलांची तपासणी झाली. त्यातील 21 बिलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत संबंधितांचे म्हणणे मागवले गेले आहे. ज्या बिलांमध्ये त्रुटी आढळल्या, त्यांच्या रिकव्हरीच्या रकमेबाबत अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post