एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या काळात जीवाची पर्वा न करता दिवसरात्र बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना मात्र नागरी असुविधांचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेद्वारे पोलिसांच्या कुटुंबांना चांगले रस्ते, स्वच्छ ड्रेनेज, पुरेसे पाणी, सार्वजनिक स्वच्छताही देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बोल्हेगावच्या पोलिस कॉलनीतील १२० पोलिसांची कुटुंबे नागरी सुविधा मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांबद्दलही असंवेदनशीलता दाखवणाऱ्या महापालिकेचा भारतीय जनसंसद, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व पीपल्स हेल्पलाईन या संस्थांनी निषेध केला आहे.
महापालिकेने बोल्हेगाव उपनगराकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाचा प्राथमिक सुविधांचा विकास अद्याप झालेला नाही. महापालिकेला अमृत पाणी योजना (फेज-३) व भुयारी गटारीसाठी कोट्यवधीचा निधी आला. मात्र, हा निधी टक्केवारी व टोलवाटोलवीत लुटण्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. जीआयसी योजनेतंर्गत पंधरा वर्षापूर्वी बोल्हेगावला पोलिस वसाहत उभारण्यात आली. या भागात १२० घरांची कॉलनी असून, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक वर्षापासून येथे पाणी, रस्ते व ड्रेनेज लाईनची समस्या आहे. या भागात पोलिस मोठ्या संख्येने राहतात. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ड्रेनेज लाईन नसल्याने घाणीचे मोठे डबके साचले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तातडीने महापालिकेने लक्ष घालून बोल्हेगाव उपनगरातील पोलीस कॉलनीत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागाला नागरी सुविधा देत नसल्याने महापालिकेचा निषेध करणारे आंदोलन करण्यात आले. फक्त करवसुलीला प्राधान्य देऊन महापालिकेत टक्केवारी व टोलवाटोलवीत लोकप्रतिनिधी व अधिकारी मग्न असल्याचा आरोप करून आंदोलनकर्त्यांनी उघड्या गटारीत टक्केवारीचा दगड व टोलवाटोलवीची प्रतिकात्मक वीट विसर्जित केली.
Post a Comment