एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, इतर विभागाचे अत्यावश्यक काम असेल तरच कर्मचारी कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे कार्यालये पुन्हा आठवडाभर बंद राहणार आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकारी व कामगार युनियनच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली. दरम्यान, लक्षणे असणार्या सर्व कर्मचार्यांची तपासणी करुन घेण्याचे आदेश महापौर वाकळे यांनी दिले आहेत.
मागील आठवड्यात महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. सोमवारपासून कार्यालये सुरू झाली होती. मात्र, मंगळवारी (दि.18) सकाळी महापौर वाकळे यांच्या उपस्थितीत युनियन व अधिकार्यांची बैठक झाली. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे, युनियनचे सचिव आनंदराव वायकर, बाबासाहेब मुदगल, आयुब शेख, गुलाब गाडे, अकिल सय्यद, नंदू नेमाणे, बाळू व्यापारी, विजय बालानी, राकेश गाडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण कायम आहे. मनपात कर्मचारी कोरोना बाधित आढळत आहेत. परिस्थिती गंभीर असल्याने वर्क फ्रॉम होम सुरू ठेवावे, कार्यालये बंद ठेवावीत, अशी भूमिका युनियने मांडली. त्यानुसार आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर विभागात अत्यावश्यक व तातडीचे काम असेल तरच कर्मचारी कार्यालयात येतील. मागील आठवड्यात जी परिस्थिती होती, ती जैसे थे राहील, असे लोखंडे यांनी सांगितले.
दरम्यान, 55 वर्षांवरील कर्मचार्यांना कोविड सेंटरच्या कामातून वगळण्याचा निर्णयही बैठकीत झाला आहे. ज्या कर्मचार्यांना इतर गंभीर आजार असतील, त्यांनी वैद्यकीय दाखल्यांसह आस्थापना विभागात कागदपत्रे सादर करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कर्मचार्यांना लक्षणे आढळून येत आहेत, अशा कर्मचार्यांच्या तत्काळ तपासण्या करण्यात याव्यात. जे फार्मासिस्ट कर्मचारी कोरोना कामकाजात आहेत, त्यांना विश्रांती देऊन इतर कर्मचार्यांची नियुक्ती करावी. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचारी आवश्यकता असेल तर कार्यालयात येतील. अन्यथा वर्क फ्रॉम होम करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, कर्मचार्यांनी जबाबदारीने काम करावे. मोबाईल सुरू ठेवून नागरिकांच्या अडचणी, समस्या वेळेत सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अत्यावश्यक काम असेल तर कर्मचार्यांनी कार्यालयात यावे, अशा सूचना महापौर वाकळे यांनी दिल्या आहेत.
Post a Comment