अहमदनगर : नवीन हॉस्पिटल उभारणीसाठी स्थायी समितीचे आदेश


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते कोविड सेंटर उभारले जात आहेत. मात्र, लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे मनपाने उपलब्ध असलेल्या एखाद्या इमारतीत नवीन हॉस्पिटल सुरू करुन कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी नगरसेवक गणेश भोसले यांनी केली. नगरसेवकांनी याला सहमती दर्शविल्यानंतर सभापती मुदस्सर शेख यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीमधून नवीन हॉस्पिटल उभारणीची कार्यवाही करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत. याबाबत ठराव करण्यात आल्याचेही शेख यांनी सांगितले.

शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मनपाकडून लक्षणे नसणार्‍या रुग्णांसाठी तात्पुरते कोविड सेंटर उभारले जात आहे. त्यावर लाखो रुपये खर्च केला जात आहे. मात्र, व्हेंटीलेटर, आयसीयु सुविधा नागरिकांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात मनपाने ठोस उपाययोजना कराव्यात. या सुविधा निर्माण करुन एखादे हॉस्पिटल उपलब्ध असलेल्या इमारतीत तातडीने सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक भोसले यांनी स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि.7) झालेल्या सभेत केली. नगरसेवक शाम नळकांडे, प्रकाश भागानगरे, सागर बोरुडे, मनोज कोतकर आदींसह सर्वच नगरसेवकांनी याला सहमती दर्शवत याबाबत प्रशासनाला तातडीने सूचना देण्याची मागणी केली.

मनपाकडे कोविड उपचार, उपाययोजनांसाठी 14 व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध आहे. तसेच सावेडी प्रभाग कार्यालयाच्या मागील बाजूस असलेली इमारत सध्या वापरात नाही. या ठिकाणी मनपाने हॉस्पिटल उभारुन या सर्व सुविधा द्याव्यात. कायमस्वरुपी या हॉस्पिटलमधून नागरिकांना सुविधा देता येतील, असे डॉ. बोरुडे यांनी सांगितले. सभापती शेख यांनीही या प्रस्तावाला तातडीने मान्यता देत या संदर्भात प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. शहरात मनपाकडून आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणे आवश्यक आहे. मनपाकडे वित्त आयोगाचा निधी उपलब्ध आहे. त्यातून हॉस्पिटल उभारण्यासाठी ठराव करण्यात आल्याचे सभापती शेख यांनी सांगितले.

दरम्यान, सभेत आरोग्यविषयक उपाययोजनांबाबत सदस्यांनी सवाल उपस्थित केले. मात्र, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे रजेवर असल्याने याबाबत केवळ चर्चाच झाली. तसेच शहरातील विविध विकास कामांच्या कोट्यवधी रुपयांच्या निविदाही सभेत मंजूर करण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post