मुलाच्या हव्यासामुळे तीन मुलींना गमवावा लागला निष्कारण जीव

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधिकारी.

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मुलगी वा मुलात भेद करू नका अशी कितीही जनजागृती केली गेली व स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी कायदेही केले गेले असले तरी जन्माला आलेल्या मुलींचे जीवही सुरक्षित नसल्याचे जामखेडच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. आईला मुलगा होत नाही म्हणून तीन मुलींना निष्कारण आपले जीवन संपवावे लागले आहे. आईने मुलगा होत नाही म्हणून स्वतःला होणारा त्रास भविष्यात आपल्या तिन्ही मुलींना होऊ नये म्हणून त्यांच्यासह विहिरीत उडी घेऊन चौघींचे जीवन संपवले. या प्रकरणी आता पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी जन्माला आलेल्या मुलीही सुरक्षित नाही व वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, ही मानसिकताही बदलायला तयार नसल्याने मुली वाचवा अभियानात सक्रिय असलेल्या सामाजिक संस्थांना आता जन्मलेल्या मुलींचे संरक्षण व्हावे म्हणून प्रभावी जागृती व उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

तिसरीही मुलगी झाल्याने सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून आईने आपल्या तीन मुलींसह  विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत मुलीच्या (विवाहितेच्या) आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सासू व सासरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून मृत विवाहितेच्या पतीस अटक केली आहे. मृत विवाहिता स्वाती कार्ले यांची आई शोभा वाल्मिक वाघ (रा. बाळगव्हाण, ता. जामखेड, हल्ली रा. २४० छानाजीनी चाळ, कलापीनगर, अहमदाबाद राज्य गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. मुलगी स्वाती हिचे लग्न कुसडगाव येथील राम दिनकर कार्ले याच्याबरोबर २००७ मध्ये झाले होते. तिला तीन मुली असून त्या कुसडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून त्यांची नावे अंजली (इयत्ता ७ वी, वय ११), सायली (इयत्ता ५ वी, वय ९) व कोमल (इयत्ता ३ री, वय ७ ) अशी आहेत. दोन मुलीनंतर पुन्हा तिसरी मुलगी झाल्याने तिचा पती राम दिनकर कार्ले, सासरे दिनकर पर्वती कार्ले व सासू शीलावती दिनकर कार्ले हे तिला उपाशीपोटी ठेवून आम्हाला मुलगा हवा आहे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते. २३ जुलै रोजी फिर्यादीचा मुलगा उमेश व पुतण्या योगेश हे मृत विवाहिता स्वातीच्या भाचीच्या लग्नाला कुसडगाव येथे गेले होते, त्यावेळी नवरा व सासू-सासरे खूप त्रास देत आहेत, मुलींचा रागराग करीत आहेत, त्यामुळे मला आता हा त्रास सहन होत नाही असे स्वातीने त्यांना सांगितले होते. फिर्यादी अहमदाबाद-गुजरात राज्यात राहत असल्याने मुलीला त्रास होईल या भीतीने त्यांनी सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

स्वाती व तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे स्वातीच्या आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी आम्ही येईपर्यंत शवविच्छेदन करू नका, असे सांगितले होते. त्यानंतर स्वातीचे आई-वडील व नातेवाईक आल्यावर त्यांनी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन करून देणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आले. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. फिर्याद दाखल केल्यानंतर चारही मृतदेहांवर अंत्यविधी करण्यात आला.
मुलाच्या हव्यासामुळे सासरच्या मंडळींकडून गर्भावस्थेतील मुलींची हत्या केली जातेच, पण आता जन्मल्यानंतर लहानचे मोठे होऊन शाळेत शिकणाऱ्या व जीवनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनी बाळगणाऱ्या मुलींचे जीवही सुरक्षित राहिलेले नाही. मुलासाठी आईला होणारा त्रास पाहून त्यांनीही आईसमवेत जीवनयात्रा संपवण्याचा केलेला विचार दुर्दैवी ठरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post