कोरोनाने ढोल-ताशांचा आवाज झाला क्षीण; गणेशोत्सवाला साधेपणाने सुरुवात


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी व त्याच्या आदला दिवस नगर ढोल-ताशा व डीजेच्या दणदणाटाने दुमदुमून जाते, पण यंदा कोरोनाने ढोल-ताशा व डीजेचा आवाज बंद केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मंडपाविना होत आहेत तर घरोघरी पारंपरिक धार्मिक विधी व उत्साहाने शनिवारी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. नगरच्या विसर्जन मिरवणुकीत ग्रामदैवत विशाल गणेश व माळीवाडा परिसरातील ११ विविध मंडळांचे मानाचे गणपती व शहर शिवसेनेचा गणपतीच असतो. नगरमध्ये मानाच्या गणपतींचा पूर्वीपासूनचा वाद आहे. त्यामुळे शहरातील अनेक मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाहीत. त्यामुळे ही मंडळे गणेशाची प्रतिष्ठापनाच दणदणाटात करतात. गणेशाचे आगमन होण्याचा आदला दिवस व आगमन होत असतानाचा दिवस शहरभर ढोल-ताशांचा गजर सुरू असतो. सायंकाळी विद्युत रोषणाईत डीजेच्या दणदणाटात प्रतिष्ठापना मिरवणुका निघतात. पण यंदा शुक्रवार व शनिवार असे दोन्ही दिवस शहरभर शांतता पसरली होती. काही तुरळक ठिकाणी बालगणेशांनी ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची छोटेखानी मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली.

यंदा कोरोनामुळे सर्वधर्मिय सण-उत्सव साधेपणाने झाले आहेत व होतही आहेत. दरवर्षी राजकीय शक्तीप्रदर्शन घडवणारा गणेशोत्सव चर्चेचा असतो. पण यंदा कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवांवर बंदी आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवण्यासही मनाई असल्याने सर्व उत्सव साधेपणाने होत आहे. याला गणेशोत्सवही अपवाद राहिलेला नाही. यंदा घरगुती गणेशोत्सवही नेहमीच्या उत्साहात व धार्मिक परंपरेत होत असला तरी त्यातही अनेकांनी साधेपणा जपला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी तर यंदा मंडपाविना गणपती प्रतिष्ठापना छोटेखानी दुकानात वा जागेत केली आहे. नगरचे ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरातही शनिवारी साधेपणाने श्रींची प्रतिष्ठापना झाली. पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व नेहा सिह यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते तर विशाल गणेश मंदिराच्या परिसरातील माळीवाडा भागातील संगम तरुण मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्रमंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर मंडळ, नवरत्न मंडळ, समझोता तरुण मंडळ, नीलकमल तरुण मंडळ व शिवशंकर मित्रमंडळ अशा ११ मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापनाही साधेपणाने झाली. यंदा गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना देखावे करण्यासही परवानगी नसल्याने कोठेही यंदा देखावे नाहीत. शनिवारी गणेश प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकाही कोठे निघाल्या नाहीत. 

दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव कोरोनामुळे एकीकडे साधेपणाने होत असताना दुसरीकडे शहरातील राजकीय-सामाजिक-व्यावसायिक क्षेत्रातील काही मान्यवर व्यक्तींचे कोरोना वा अन्य आजाराने निधन झाले असल्याने त्या दुःखाचे सावटही यंदाच्या गणेशोत्सवावर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post