केके रेंज प्रश्नासाठी न्यायालयात जाणार; खा. सुजय विखेंची घोषणा

 
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : के.के.रेंज प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाणार आहे, अशी घोषणा नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी रविवारी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे केली. 2 दिवसात बाधित 23 गावांतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे व नंतर अंतिम भूमिका मांडणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
1980 पासून केके रेंज जमिनीचे आरक्षण पडले आहे, व आताही 2026 पर्यंत या आरक्षणाला मुदतवाढ दिली गेली आहे. पण आजपर्यंत राज्यातील कोणत्याही सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे मागील भाजप सरकार व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जबाबदार ठरवणे चुकीचे आहे, असा दावा करून खा विखे म्हणाले, 23 बाधित गावातील किती शेतकऱ्यांचे किती क्षेत्र जाते, याची माहिती जिल्हा प्रशसनाकडेही नाही, बाधित क्षेत्राचा नकाशा कोणाकडे नाही, त्यामुळे किती नुकसान भरपाई मिळणार, याचेही सारे अंदाज चुकीचे आहेत. मागील 2 ममहिन्यापासून या विषयाशी सर्व पत्र व्यवहार मी संकलित केले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडून घेतलेल्या लष्कराच्या जमिनीचा परतावा जमिनीच्या रूपातच द्यावा लागतो. हा कायदा आहे. पण 1980 पासूनच्या राज्य सरकारने तो पाळलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी न्यायालयात जाणार व त्यांचा सर्व खर्च आपण स्वतः उचलणार, असेही विखे यांनी जाहीर केले. 
 
दरम्यान बाधित 23 गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी के के रेंजमध्ये जाणार आहेत, आशा बाधित शेतकऱ्यांची समिती गावा गावातुन करावी व या समितीने शेतकऱ्यांचे म्हणणे संकलीत करून माझ्याकडे द्यावे. न्यायालयीन लढ्यासाठी ती उपयोगी ठरेल, असेही ते म्हणाले. बाधित गावातील कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र जाणार आहे, याची माहिती आपण संकलित केली असल्याचेही त्यांनी सांगितले व यादीतून नाव काढून देतो व जास्त नुकसान भरपाई मिळवून देतो, असे सांगणाऱ्या धंदेवाईक लोकांपासून लांब राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post