के.के. रेंज भूसंपादनासंदर्भात खा. डॉ. विखे साधणार शेतकऱ्यांशी संवाद; रविवारी पारनेरला बैठका


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
विळद घाटातील लष्करी सराव केंद्र असलेल्या केके रेंजसाठी होत असलेल्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची मोहीम नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सुरू केली आहे. रविवारी (२३ ऑगस्ट) सकाळी १० वाजता ते पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. केके रेंज भूसंपादनाबाबत लष्कराची नेमकी काय भूमिका आहे, याबाबतची माहिती ते या संवादादरम्यान शेतकऱ्यांना देणार आहेत तसेच शेतकऱ्यांचे भूसंपादनाबाबत नेमके काय म्हणणे आहे, हेही जाणून घेणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर, राहुरी व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन केके रेंज लष्करी सराव केंद्रासाठी होणार आहे. या सराव क्षेत्रासाठी १९४६ आणि १९५६मध्ये भूसंपादन झाले आहे व आता लष्कराच्या सरावासाठी अतिरिक्त एक लाख एकर जमीन रेड झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. या जमिनीचे संपादन लष्कराकडून होणार आहे. यासंदर्भात खा. डॉ. विखे यांनी नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली आहे. त्यावेळी झालेली चर्चा ते शेतकऱ्यांना सांगणार आहेत. 

रविवारी सकाळी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे संवाद मोहीम झाल्यावर जांभळी, वनकुटे, गाडेझाप (पळशी), ईश्वर झाप (वडगाव सावताळ) व गाजदीपूर येथील शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार आहेत. सोमवारी (२४ ऑगस्ट) अशी संवाद मोहीम राहुरी तालुक्यातील संबंधित गावांतून व मंगळवारी (२५ ऑगस्ट) नगर तालुक्यातील संबंधित गावांतून ते राबवणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post