नगरचा सांस्कृतिक-व्यावसायिक आधार हरपला; 'कोहिनूर'च्या प्रदीपशेठ गांधी यांनी नगरकरांची श्रद्धांजली


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
'सदा सर्वदा सर्वोत्तम...कोहिनूर' असे ब्रीदवाक्य नगरकरांच्याच नव्हे तर राज्यभरातील व देशविदेशातील वस्त्रशौकिनांच्या हृदयात कोरणारे प्रदीपशेठ गांधी (वय ६५) म्हणजे नगरच्या कापड बाजाराची शान व कोहिनूर हिरा होते, म्हटले तर वावगे ठरणारे नाही. त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक व व्यावसायिक चळवळीचा आधार निखळला आहे, हरपला आहे. मंगळवारी दुपारी व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियावरून त्यांच्या दुःखद निधनाचे वृत्त सगळीकडे पसरले आणि समाजमन हळहळले. समस्त नगरकरांना त्यांचे अकाली जाणे चटका लावून गेले. लग्नाचा बस्ता म्हणा वा घरातील कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कापड खरेदीने होते व ती खरेदी कापड बाजारातील कोहिनूरमध्ये करणे म्हणजे शान व एकप्रकारचे प्रेस्टिज मानले जात होते. या भव्य दालनात जाऊन कपडे खरेदीचा मनसोक्त आनंद लुटताना प्रदीपशेठ गांधींशी हसतमुख संवाद साधण्याचे समाधान अनेक नगरकरांनी घेतले आहे. नगरची सांस्कृतिक चळवळ केवळ तुम्ही आर्थिक आधार दिल्यामुळे (प्रदीपशेठ गांधी) जिवंत राहिल्याचे त्यांना अनेकांनी आवर्जून सांगितले आहे. पण, मी वेगळे काही केले नाही. नगरच्या मातीने व नगरच्या जनतेने आमच्या कष्टाला साथ दिली आहे, व्यवसायात यश दिले आहे. त्यामुळे त्याचे ऋण थोडेफार फेडण्याचा प्रयत्न केला आहे, असेच प्रदीपशेठ नेहमी सांगायचे. कोणालाही मदत केल्याचा कोणताही मोठेपणा न बाळगणारे व त्याची कोठेही व कधीही वाच्यता न करणारे हे हसतमुख निगर्वी व्यक्तिमत्त्व आता कोहिनूरच्या दालनात दिसणार नाही, याची रुखरुख नगरकरांनाच नव्हे तर राज्यभरातील व देशविदेशातील अनेकांना असणार आहे.

कष्टसाध्य यश

बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रदीप गांधी यांनी १९५० मध्ये कोहिनूरच्या माध्यमातून व्यवसायात पदार्पण केले. व्यवसायाच्या यशाचे श्रेय त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना नेहमी दिले. व्यवसायात ग्राहकांचा विश्वास महत्वाचा होताच, पण दुकानातील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचाही यशात वाटा असल्याचे ते नेहमी सांगायचे. दुकानातील कर्मचाऱ्यांनी आपलेपणाच्या व कोहिनूर वस्त्रदालन एक कुटुंब आहे, या भावनेतून केलेल्या कामामुळेच दुकानाचा नावलौकिक वाढत गेला, कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेतून काम केल्यामुळेच भरभराट झाल्याचे ते नेहमी सांगायचे. दुकानात ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना सर्वात अगोदर आपुलकीच्या शब्दांची गरज असते व दुकानातील कर्मचाऱ्यांकडून या गोष्टी नेहमी जपल्या जातात, याचा त्यांना अभिमान होता. ग्राहकांकडून विविध प्रकारचे, किमतीचे कपडे दाखवण्याची मागणी केली जात असताना काही वेळेस मनासारखे कपडे पसंत करण्यात दोन-तीन तास सहज निघून जात असले तरी कर्मचारी कोणत्याही प्रकारचा ताण चेहऱ्यावर न आणता ग्राहकाचे पूर्ण समाधान होऊन त्यांच्याकडून कपडे खरेदी होईपर्यंत आपले काम मनापासून करीत राहतात व त्यामुळेच दुकानात खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत राहिली आहे, असे ते आवर्जून सांगायचे. प्रदीपशेठ गांधी यांना कोहिनूरची धुरा वारसा हक्काने मिळाली असली तरी तिचा लौकिक त्यांनी कष्टाने वाढवला व दुसरीकडे नगरमधील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीला आर्थिक आधार देत कोहिनूरची सामाजिक बांधिलकीही जपली व या चळवळींतील उदयोन्मुख कलावंतांना पाठबळही दिले. नगरमधील आताच्या कापड बाजारात जागा खरेदी करून आजोबा कनकमल गांधी यांनी कापड व्यवसायास सुरुवात केली. व्यवसायात सचोटी व प्रामाणिकपणा कायमस्वरुपी जपल्याने ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना चांगली सेवा दिल्यामुळे भराभराट होत गेली व त्यामुळे ८५ वर्षानंतरही कापडाच्या व्यवसायात कोहिनूर वस्त्रदालनाचे नाव आघाडीवर आहे. वडील वसंतलाल गांधी यांनीही याच पद्धतीने काम करण्यावर भर दिला. तोच वारसा तिसऱ्या पिढीतील प्रदीपशेठ गांधी यांनीही जपला. कोहिनूर वस्त्रदालनातील कापडाची व तेथील ग्राहक सेवेची विश्वासार्हता त्यांनी जपली तसेच बदलत्या काळानुसार नवे बदल स्वीकारत कोहिनूरच्या आकर्षक रचनेत व सेवेतही बदल घडवले. युवक वर्गाची आवड असणाऱे विविध प्रकारचे कपडे, छोट्या-मोठ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही येथे उपलब्ध करून दिल्या.

सामाजिक बांधिलकी जपली
प्रदीपशेठ गांधी यांनी कोहिनूरच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही केले. पैशांची गरज असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी मदत दिली. याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देण्याचे काम केले. पैशांअभावी शिक्षण घेता येत नसलेल्या हुशार मुलांना गांधी कुटुंबाकडून आर्थिक मदत केली. शहरातील सांस्कृतिक चळवळीला उर्जितावस्था आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना कोहिनूरने मनापासून साथ दिली. शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, स्पर्धा घेणे या माध्यमातून शहराची सांस्कृतिक ओळख जपण्याचा प्रयत्न केला. नगरकरांचा दरवर्षीचा गुढीपाडवा केवळ कोहिनूरच्या पाठबळाने संगीतमय होत असे. रसिक ग्रुपच्या गुढीपाडवा संगीत रजनीला प्रदीपशेठ यांचा भक्कम आधार नेहमीच राहिला. आर्थिक मदत देण्याएवढेच काम करून प्रदीपशेठ थांबले नाही तर पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण जनजागृतीचीही कामे कृतीशील कामातून केली. त्यांनी नगरच्या भुईकोट किल्ला परिसरात ३०० विविध प्रजातींचे वृक्षारोपण त्यांनी केले. वृक्षारोपण केल्यानंतर या रोपांच्या देखभालीचेही कामही कोहिनूर परिवाराद्वारे केले गेले. दोन वर्षांपूर्वी दुष्काळी स्थिती असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावरील जेऊर बायजाबाई येथे कोहिनूरमधील दोनशेवर कर्मचाऱ्यांसह स्वतः प्रदीपशेठ गांधी हातात कुदळ-फावडे घेऊन मैदानात उतरले. तेथील डोंगराळ भागात जाऊन पाणी अडवा-पाणी जिरवा कामासाठी सामूदायिक श्रमदान केले व तलावातील गाळ-माती काढून त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढवली. कोहिनूर वस्त्रदालनाच्या माध्यमातून नगरच्या बाजारपेठेची शान त्यांनी जशी वाढवली, तशीच सामाजिक बांधिलकी जपून कोहिनूरच्या माध्यमातून शैक्षणिक-वैद्यकीय मदत तसेच सांस्कृतिक व साहित्य चळवळीला आधार दिला. त्यांच्या निधनाने हा आधार हरपला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post