अखेर मंत्र्यांनाच घ्यावी लागली महामार्गांवरील खड्ड्यांची दखल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर ते कोल्हार व तेथून पुढे कोपरगावपर्यंतच्या महामार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची दखल अखेर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाच घ्यावी लागली. या महामार्गाचे खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले, पण या कामासाठी पैसे नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट झाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्य़ाची ग्वाही त्यांना द्यावी लागली.

तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. रस्ते व जिल्ह्यातील पुलांच्या कामांचा आढावा घेतला. नगर ते कोल्हार व कोल्हार ते कोपरगाव या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते तातडीने भरण्याचे आदेश त्यांनी दिले. सध्या खडी टाकून हे खड्डे भरण्यात येत आहेत. उघडीप मिळताच डांबरमिश्रीत खडीने खड्डे भरण्यात येतील, असे यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले. तसेच नगर ते कोल्हार डांबरीकरणाचे काम अर्थसंकल्पित असून सध्या निधी उपलब्ध नसल्याने काम हाती घेता येत नाही, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिल्यावर याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून काम मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post