कर्जमाफी मिळाली हो १६०० कोटींची; ३ हजारावर शेतकऱ्यांचा 'प्रमाणीकरणा'साठी शोध सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर लगेच जाहीर केलेली २ लाखापर्यंतची कर्जमाफी प्रत्यक्षात आली आहे. जिल्हयातील २ लाख ८९ हजार ५७० शेतकरी पात्र ठरले असून त्यापैकी २ लाख ८५ हजार ९६८ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यात आली असून त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. यात जिल्हा सहकारी बँक व सेवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना १३०७ कोटी ५० लाख तर राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ३०५ कोटी २४ लाख रुपये मिळाले आहेत. या दोन्ही बँकामिळून शेतकऱ्यांना आतापर्यंत १६१२ कोटी ७४ लाखाची माफी मिळाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती नियमितपणे कर्जफेड करणारांना प्रोत्साहन रक्कम मिळण्याची तसेच २ लाखावर कर्ज थकबाकी असलेल्यांच्या माफीची. राज्यात सध्या कोरोनाचा धुमाकुळ सुरू असल्याने व अर्थव्यवस्था विस्कळित झाल्याने या दोन्ही माफींसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ३ हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेमध्ये जाऊन १० ऑगस्ट २०२० पर्यंत आधार प्रमाणीकरण करावे आणि कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येत आहे. या योजनेमध्ये अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ५५३ खात्यांचे व इतर बँकांच्या २ हजार ४९ खात्यांच्या मिळून एकूण ३ हजार ६०२ खात्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा. आधार प्रमाणीकरण करताना ज्या शेतकऱ्यांची तक्रार तालुकास्तरीय समितीकडे असेल त्या शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तक्रार पावती घेऊन संबंधित तालुका तहसील कार्यालय किंवा सहकार विभागाच्या सहायक निबंधक कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या तक्रारीचे निराकरण करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post